एटीएम कार्ड ची अदलाबदल करून वृद्धांना फसवणारा भामटा जेरबंद

सातारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

by Team Satara Today | published on : 27 July 2025


सातारा : एटीएम कार्डची अदलाबदल करून वयोवृद्धांची फसवणूक करणाऱ्या भामट्यास सातारा स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्याला पुढील कारवाई करता पुणे शहर मधील उत्तम नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हिमांशू इंद्रराज सिंग रा. पट्टी राणीगंज, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश असे जेरबंद करण्यात आलेल्या भामट्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी महाराष्ट्रामधील एटीएम सेंटरमध्ये वयोवृद्धांच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक करणारी टोळी पकडण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करून त्यांना त्याबाबत कारवाईचे आदेश दिले होते.

दि. 26 रोजी एकजण एटीएम कार्ड स्वाईप करून त्याद्वारे सातारा शहरात खरेदी करत असल्याची गोपनीय माहिती देवकर यांना मिळाल्याने त्यांनी त्याबाबत कारवाई करण्याच्या सूचना विश्वास शिंगाडे व त्यांच्या पथकास दिल्या. त्याप्रमाणे पथकाने सातारा शहरात पेट्रोलिंग करून गोपनीयरित्या माहिती काढली असता एक जण शाहू स्टेडियम येथील एका दुकानामध्ये एटीएम कार्ड स्वाईप करून लॅपटॉप खरेदी करीत असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्या ठिकाणी जाऊन त्याबाबत माहिती घेऊन संबंधित संशयितास छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या समोर पकडून त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने उत्तम नगर, पुणे या ठिकाणी एका महिलेने त्यास पैसे काढून देण्यासाठी तिचे एटीएम व त्याचा पिन नंबर त्याला सांगितला होता. त्याने त्या महिलेस पैसे काढून देऊन तिला त्याच्याकडील बनावट एटीएम कार्ड दिले व तिचे एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवून त्या एटीएम द्वारे खात्यातील पैसे काढून वस्तू खरेदी करत असल्याचे सांगितले. याबाबत पथकाने अधिक माहिती घेतली असता उत्तम नगर पोलीस ठाण्यात संबंधित गुन्हा नोंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर पकडलेल्या संशयितास पुढील कारवाई करता उत्तम नगर पोलीस ठाणे, पुणे शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या कारवाईत पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस अंमलदार संजय शिर्के, अमोल माने, अजित कर्णे, जयवंत खांडके, स्वप्निल दौंड, दलजित जगदाळे यांनी सहभाग घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यात खरीपाचा ७२ टक्के पेरा
पुढील बातमी
मुंबईकडे निघालेली शिवशाही बस पेटली

संबंधित बातम्या