सातारा : गणरायाच्या आगमनानंतर लक्ष्मीच्या पावलांनी येणार्या गौराईचे मंगळवारी घरोघरी आगमन होत आहे. तिच्या स्वागतात काही कमी राहू नये, यासाठी घराघरांत फराळाचे पदार्थ तयार करण्यात समस्त महिलावर्ग व्यस्त झाला आहे. तर महिलांच्या या कष्टाला उसंत देण्यासाठी हलवायांनीही विविध पदार्थांनी दुकाने भरून टाकली आहेत. मात्र कच्च्या मालाचे दर वाढल्याने रेडिमेड मिळणारा फराळ वीस टक्क्यांनी महागला आहे. दरम्यान, मंगळवारी येणार्या गौरीला सजविण्यासाठी साहित्य खेरदीस आलेल्या महिलांच्या गर्दीने बाजारपेठ फुलून गेली आहे.
गौरीचा सण महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा सण असतो. या गौराईच्या स्वागतासाठी आता महिलांची धांदल उडाली आहे. तिला दागिन्यांनी सजविण्यासाठी महिला आता बाजारात इमिटेशन ज्वेलरी खरेदी करू लागल्या असून, आज सातार्याची बाजारपेठ महिलांच्या गर्दीने फुलून गेली होती. मोती चौक परिसर आज दागिने विक्रेत्यांनी भरून गेला होता. बाजूबंद, कंबरपट्टा, नथ, ठुशी, जोडवी, मेखला, बांगड्या, या इमिटेशन ज्वेलरी ला आज प्रचंड मागणी होती. येथील सदाशिव पेठेतील सराफ बाजार गर्दीने फुलून गेला होता. मणी मंगळसुत्रापासून कोल्हापुरी साजापर्यंत आणि राणीहारापासून मुकुट, कमरपट्ट्यांपर्यंतचे रंगीबेरंगी खडे जडवलेले दागिने महिला खरेदी करत होत्या. त्या बरोबरच सुंदर असे गौरीचे मुखवटे बाजारात सर्वत्र उपलब्ध असून, गंगा-गौरी असे दोन मुखवटे खरेदीस महिलांचे प्राधान्य आढळले.
गौरी आगमनादिवशी गौरीस भाजी भाकरीचे भोजन दिले जाते. दुसरे दिवशी मात्र गौरीला विविध पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. त्यासाठी अनेक महिला गणपतीचे आगमन होताच दुसर्या दिवशीपासून या पदार्थांच्या तयारीला लागतात. त्यामुळेच आता घरोघरी विविध पदार्थांचा दरवळ सुटला आहे. अनेक महिलांना कामातून आणि नोकरी व्यवसायातून पदार्थ तयार करण्यास वेळ मिळू शकत नाही. त्यामुळे काही पदार्थ घरी तयार करून काही तयार पदार्थ खरेदीवर त्यांचा भर असतो. मिठाईतर आवर्जून खरेदी केली जाते. महिलांची गरज भागविण्यासाठी मिठाईचे दुकानदार सज्ज झाले आहेत. आजच सर्वत्र त्याची विक्री सुरू झाली आहे. करंजीपासून चकल्यांपर्यंत अन् गुलाबजामपासून माव्याच्या मोदकांपर्यंत सर्व पदार्थ विक्रेत्यांनी विक्रीस मांडले आहेत. लाडू करंजी चकली हे 200 ते 230 रूपये तर अनारसे हे 300 रुपये किलो पासून उपलब्ध आहे. यंदा तेल साखरं बेसनं 20 टक्के दर वाढ झाल्याने गौराईच्या कोडकौतुकाचा फराळ महागला आहे.
मावा, काजू, स्ट्रॉबेरी, गुलकंद असे विविध स्वादाचे मोदक यावर्षी मिठाई विक्रेत्यांनी बाजारात आणले आहेत. त्याचे दर साधारण 240 रुपये किलो असे आहेत. मावा, काजू मोदकांचे दर 480 रुपयापर्यंत आहेत.
सोनपावलांनी उद्या गौराई येणार घरी
गोडधोड फराळ महागला; इमिटेशन ज्वेलरी ला प्रचंड मागणी
by Team Satara Today | published on : 09 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा