सातारा : श्री समर्थ सेवा मंडळ ,सज्जनगड यांच्यावतीने सातारा येथील श्री समर्थ सदन येथे दासनवमी निमित्त आठ दिवस आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथराज दासबोध पारायण आणि कीर्तन प्रवचन कार्यक्रमाची सांगता पुण्यातील प्रसिद्ध रामदासी कीर्तनकार ह.भ.प. दीपाताई भंडारे यांच्या अत्यंत प्रभावी आणि सुश्राव्य रामदासी कीर्तनाने झाली. सातारकर श्रोत्यांचा त्यांच्या कीर्तनाला अतिशय उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
श्री समर्थ रामदास स्वामी विरचित ..गुरू दातारे दातारे,अभिनव कैसे केले रे ".. या प्रसिद्ध अभंगावर सखोल आणि विस्तृत निरूपण दीपाताईंनी केले. याद्वारे त्यांनी सद्गुरू महिमा आणि श्रीगुरू भक्तिचे महत्व तर सांगितले. तसेच जीवनाच सार्थक शाश्वत आत्मसुख प्राप्तीत असून सद्गुरू हे कैवल्यपद देणारे जगातले सर्वश्रेष्ठ दाते कसे आहेत, अशा ब्रह्मसुखाचा अनुभव देणाऱ्या सद्गुरूंची मुख्य लक्षणे कोणती, आत्मकल्याणासाठी आवश्यक अंतःकरण शुध्दिसाठी कसे आणि कोणते प्रयत्न केले पाहिजेत, याचे सखोल निरूपण दीपाताईंनी श्री समर्थांच्या दासबोधाच्या आधारे आणि दैनंदिन व्यवहारातील विविध उदाहरणे देत रोचकपणे केले. तसेच सध्याच्या देशकाल सामाजिक परिस्थितीचे भान श्रोत्यांना करून देत खरे सद्गुरू कसे ओळखायचे, परमार्थ क्षेत्रातील फसवणूक कशी टाळायची याची दृष्टीही त्यांनी श्री समर्थांच्या दासबोधातील विविध ओव्यांच्या आधारे उपस्थित श्रोत्यांना दिली.
कीर्तनाच्या उत्तररंगात दीपाताईंनी सद्गुरूसेवा आणि गुरूभक्तीचा मानदंड असणारे आधुनिक काळातील श्री समर्थांचे शिष्योत्तम "सद्गुरू भगवान श्रीधरस्वामीं यांचे अवतार रहस्य " या विषयावरील आख्यान उत्तमरित्या प्रभावीपणे रंगवले आणि सभागृहातील वातावरण भारावून टाकले.
श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेचे संस्थापक असणारे आणि त्याद्वारे सज्जनगडाचा कायापालट घडवण्याच्या कार्याची मुहूर्त मेढ रचणारे भगवान श्रीधरस्वामी आहेत. त्यामुळे श्री समर्थ सेवा मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे अौचित्य साधून त्यांचे पवित्र स्मरण करण्यासाठी भगवान श्रीधरस्वामींचे आख्यान सादर करत असल्याचे दीपाताईंनी आवर्जून नमूद केले, तेव्हा श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
दीपाताई या उत्तम लेखिका, मुक्तपत्रकार, आकाशवाणी पुणे केंद्रावर वृत्तनिवेदिका आणि गायनात संगीत अलंकार पदवीप्राप्त असून, त्यांच्या दीर्घ आणि व्यापक अनुभवाचे प्रतिबिंब त्यांच्या कीर्तनातही उपस्थितांना जाणवले! अभ्यासपूर्ण ओघवते वक्तृत्व, सुरेल परिपक्व आणि शास्त्रीय संगीतातील रागांवर आधारित गायन, यामुळे श्रोते दीपाताईंच्या कीर्तनाने मंत्रमुग्ध झाले ! त्यांना हार्मोनियमवर बाळासाहेब चव्हाण तर तबल्यावर विश्र्वनाथ पुरोहित यांनी उत्तम समर्पक साथ केली. या सर्व कलाकारांचा सत्कार समर्थ सेवा मंडळाचे वतीने ज्येष्ठ समर्थ भक्त व समर्थ विद्यापीठाचे समर्थभक्त कुलपती रमेशबुवा शेंबेकर आणि सौ.कल्पना ताडे यांच्या हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रमास समर्थ विद्यापीठाचे आदरणीय समर्थ भक्त शेंबेकरबुवा, तसेच सुरेश काळे, गजानन बोबडे, संतोष वाघ, राजाभाऊ कुलकर्णी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.