सातारा : जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे. सततच्या पावसामुळे केळघर घाटात दरड कोसळली. यामुळे साताऱ्याहून मेढामार्गे महाबळेश्वरला जाणारी वाहतूक पूर्ण बंद झाली आहे. वाहनधारकांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. तर घाटात पडलेली दरड हटविण्याचे काम सुरू झालेले आहे. यंत्राच्या सहाय्याने दरड बाजुला केली जात आहे.
सातारा शहरासह पश्चिम भागातील घाट परिसरात पाऊस सुरूच आहे. तसेच मोठ्या धरणक्षेत्रातही पावसाची हजेरी आहे. यामुळे मोठे प्रकल्प भरू लागले आहेत. कोयना धरणातही ७८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण भरण्यासाठी अजूनही २७ टीएमसीहून अधिक पाण्याची गरज आहे. तर २४ तासांत नवजा येथे ८८ तर कोयनेला ७६ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. तसेच पावसामुळे केळघर घाटात दरड कोसळल्याने सातारा - महाबळेश्वर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.
जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा असली, तरी पश्चिमेकडे आबादानी स्थिती आहे. सातारा, जावळी, पाटण, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यांत आठवड्यापासून जोरदार पाऊस होत आहे. यामुळे ओढे, नाले खळखळून वाहत आहेत. कास, बामणोली, तापोळा, नवजा, पाथरपुंज आणि कांदाटी खोऱ्यात पावसाचा जोर आहे. दिवसभर पाऊस सुरू असतो. या पावसामुळे लोकांना बाहेर पडणेही अवघड झाले आहे. त्यातच कोयनेसह धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या धरणक्षेत्रातही पाऊस कायम आहे. या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोयना धरणातील साठाही वेगाने वाढला. एक महिन्यात कोयनेत जवळपास ६५ टीएमसीहून अधिक साठा वाढलेला आहे. पावसाचे प्रमाण असेच कायम राहिल्यास सर्व मोठे प्रकल्प लवकरच भरण्याचा अंदाज आहे.
दरड हटवण्याचे काम युध्दपातळीवर...
जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे. सततच्या पावसामुळे केळघर घाटात दरड कोसळली. यामुळे साताऱ्याहून मेढामार्गे महाबळेश्वरला जाणारी वाहतूक पूर्ण बंद झाली आहे. वाहनधारकांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. तर घाटात पडलेली दरड हटविण्याचे काम सुरू झालेले आहे. यंत्राच्या सहाय्याने दरड बाजुला केली जात आहे.