सातारारोड : महायुतीतील तिन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेले शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही. शेतकरी व लाडक्या बहिणींची फसवणूक या सरकारने केली आहे, असा हल्लाबोल आमदार शशिकांत शिंदे यांनी आज महायुतीच्या सरकारवर केला.
महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोरेगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये आमदार शिंदे, काँग्रेसचे राजेंद्र शेलार, शिवसेनेचे दिनेश बर्गे, राजाभाऊ जगदाळे, संजना जगदाळे, अर्चना देशमुख, मनोहर बर्गे, कल्याण भोसले, ॲड. पांडुरंग भोसले, घनश्याम शिंदे, संजय पिसाळ, किशोर ना. बर्गे, सचिन झांजुर्णे, अमर बर्गे, हेमंत बर्गे, प्रीतम बर्गे, डॉ. गणेश होळ, गणेश धनावडे, प्रशांत गुरव, अक्षय बर्गे आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चेकऱ्यांपुढे आमदार शिंदे बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘या सरकारने दहा लाख लाभार्थी असलेल्या लाडक्या बहिणींची नावे रद्द केली. शेतकरी सरसकट सात व दहा अश्वशक्तीचे वीजपंप शेतीसाठी चालवतात. त्यांना वीजबिल माफ केले नाही. सरकारने केवळ तीन अश्वशक्तीच्या पंपाचे वीजबिल माफ केले आहे. सरसकट वीजबिल माफ न करता सौरऊर्जा प्रकल्प डोक्यावर लादला आहे. सातारा जिल्ह्यात सर्वात जास्त जमिनी या प्रकल्पासाठी घेतल्या आहेत. यासंदर्भातील सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाला बगल देऊन निर्णय घेणाऱ्यांच्या विरोधात आम्ही कोर्टात दावा ठोकणार आहोत. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यातील आश्वासनानुसार कर्जमाफी होईल म्हणून शेतकऱ्यांनी सोसायटीचे पैसे भरले नाहीत.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्र्यांनी सांगितले, की मार्चअखेरपर्यंत पैसे भरा. त्यावर मुख्यमंत्री देखील म्हणाले, की उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णय हाच सरकारचा निर्णय आहे. याचाच अर्थ सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सभागृहात विचारणा केली असता, सरकारकडे पैसे नसल्याचे सांगितले गेले. मग पैसे गेले कुठे? गेल्या अडीच वर्षांत आठ लाख कोटींचे पुरवणी बजेट करून राज्याची तिजोरी कोणी लुटली? काय कामे काढली, ती जनतेच्या हिताची होती, की लोकप्रतिनिधींच्या हिताची होती, याची चौकशी झाली पाहिजे.’’
कृषिमंत्री दोन वेळा शेतकऱ्यांविषयी बोलले, तिसऱ्या वेळेला तर त्यांनी 'कर्जमाफीच्या पैशातून तुम्ही साखरपुडा, लग्न करता का', असे म्हणत शेतकऱ्यांची थट्टा केली. आर्थिक पाहणी अहवालात औद्योगिक क्षेत्रापेक्षा कृषी क्षेत्राकडून जास्त पैसा आल्याचे समोर आले आहे. याचाच अर्थ सरकारला पैसा मिळवून देऊन सरकारी तिजोरी सांभाळण्याचे काम शेतकऱ्यांनी केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री म्हणतात, की मागच्या काही वर्षांमध्ये उद्योगपतींनी १८ लाख कोटींचे कर्ज बुडवले. मात्र, दुसरीकडे कर्ज फेडू शकत नाही, या विवंचनेतून शेतकरी आत्महत्या करत आहेत, ते परदेशात पळून जात नाहीत, याची सरकारला जाणीव नाही, अशा शब्दांत आमदार शिंदे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. राजेंद्र शेलार व दिनेश बर्गे यांचीही भाषणे झाली.