दुष्काळाच्या संकटाचे संधीत रूपांतर करा; कायमस्वरूपी टंचाईमुक्तीसाठी नियोजनबद्ध कामे करा - जिल्हाधिकारी संतोष पाटील

by Team Satara Today | published on : 06 November 2026


सातारा : यंदाच्या दुष्काळी संकटाचे संधीत रूपांतर करून जिल्ह्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाई कायमस्वरूपी संपविण्याच्या दृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने व नियोजनबद्ध काम करावे. भविष्यात पुन्हा टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यादृष्टीने दीर्घकालीन उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या.
टंचाई निवारणासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीतील आराखड्यात समाविष्ट कामांना २० नोव्हेंबरपूर्वी प्रशासकीय मंजुरी देऊन ती प्रत्यक्ष सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, संबंधित उपजिल्हाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, चारा टंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभागाने अधिकाधिक क्षेत्रावर चारा पिकांची लागवड होईल, असे नियोजन करावे. जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेला चारा तसेच आगामी काळात उपलब्ध होऊ शकणाऱ्या चाऱ्याचे अचूक सर्वेक्षण करून त्याची माहिती सादर करावी. चारा उत्पादन, साठवणूक आणि व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी चारा प्रशिक्षण अभियान राबवावे.
पूर्वेकडील तलाव क्षेत्रात गाळपेर क्षेत्राचा प्रभावी वापर करून चारा व इतर पिकांच्या उत्पादनासाठी प्रयत्न करावेत. उपलब्ध पाण्याचा विचार करूनच विकासकामांचे नियोजन करावे. पाणी उपलब्धतेनुसार रब्बी पिकांच्या सिंचनाचे नियोजन करणे आवश्यक असून, उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने आणि योग्य पद्धतीने वापर करण्यावर भर द्यावा.
शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी बँका आणि खासगी वित्तीय संस्थांनी कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये. तसेच कोणत्याही प्रकारे जबरदस्तीने कर्जवसुली करू नये, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
दुष्काळ ही केवळ तात्पुरती समस्या न मानता भविष्यातील जलसुरक्षेच्या दृष्टीने काम करण्याची संधी म्हणून सर्व विभागांनी पाहावे. उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती, पाणीसाठे आणि शासकीय योजनांचा एकत्रित उपयोग करून जिल्हा कायमस्वरूपी टंचाईमुक्त करण्यासाठी ठोस कृती करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विद्यार्थी दिनानिमित्त साताऱ्यात बार्टीच्यावतीने शनिवारी विविध कार्यक्रम; व्याख्यान, पुस्तक विक्री, वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव, गीतांतून प्रबोधन

संबंधित बातम्या