किल्ल्याच्या मुळ ढाच्यात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही याची दक्षता घ्या - खा. उदयनराजे भोसले, किल्ले प्रतापगड प्राधिकरणाच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा

by Team Satara Today | published on : 13 July 2026


सातारा  : प्रतापगड हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे, दूरदृष्टीचे गौरवशाली प्रतिक आहे.  प्रतापगड हे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झाले आहे. याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रतापगड किल्ला प्राधिकरण स्थापन करण्यात आले. किल्ला जनत व संवर्धनासाठी 127 कोटी निधी मंजूर असून यामधून संवर्धनाची विविध कामे करण्यात येणार आहेत. या अंतर्गत विविध कामे होत असताना किल्ल्याच्या मुळ ढाच्यात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही याची दक्षता घेऊनच किल्ल्याचे संवर्धन करण्यात यावे , असे प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले. 

प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची बैठक खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोल्त होते. या बैठकीला प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाचे सह अध्यक्ष शंभूराज देसाई , मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील,  जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, पुरातत्व विभागाचे सहसंचालक डॉ. विलास वाहने, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, प्राधिकरणाचे अशासकीय सदस्य मिलिंद एकबोटे, नितीन शिंदे, शरद पोंक्षे, सदाशिव टेंटविलकर, सोमनाथ धुमाळ, चंद्रकात पाटील, विजय नायडू, अमोल जाधव, पंकज चव्हाण आदी उपस्थित होते.


छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ले प्रतापगडचे बांधकाम गेले 400 वर्ष अभेद्य आहे, आता जे आपण जतन व संवर्धनाचे काम करत आहोत, तेही पुढे असेच शतकानूशतके टिकले पाहिजे, असे करा असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

शिवकाळात पार येथे बाजारपेठ होती , प्रतापगडच्या विकास कामांच्या आराखड्यात याचाही समावेश करावा, तसेच किल्ल्याशी संबंधित विविध ठिकाणांचाही पर्यटन वाढीच्या दृष्टीने या आराखड्यामध्ये समावेश करावा, अशी सूचना मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.

प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग दर्शवणारी भित्तीचित्रे उभारण्यात येणार आहेत यास पर्यटन विभागाची मान्यता घेण्यात यावी, लाईट अँड साऊंड शो साठीची स्क्रिप्ट ऐतिहासिक विषयांचे लेखन करणाऱ्या दिग्गजांकडून लिहून घेण्यात यावी, तसेच त्यास सांस्कृतिक विभागाकडून मान्यता घेण्यात यावी, स्थानिकांना रोजगार निर्मिती व्हावी व दिव्यांग, वृद्ध यांच्या ने-आण करण्यासाठी डोलीची व्यवस्था करावी, येथील जुन्या तीन तलावांचे उत्खनन करावे, गाळ काढावा तसेच त्यांचे पुनर्जीवन करावे, होत असलेल्या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करून घ्यावे, जेथून छत्रपती शिवाजी महाराज दैनंदिन कामकाज करत होते त्या ठिकाणी सदर निर्माण करण्यासाठीचा प्रस्ताव पुरातत्त्व खात्याला पाठवावा, या ठिकाणी असणाऱ्या विविध मंदिरांचा लुक 400 वर्ष पूर्वीप्रमाणे असावा अशा विविध मुद्द्यांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
48 तासांत मायलेज 17 वरून थेट 5 किमीपर्यंत घसरल्याचा दावा; प्रसिद्ध युट्यूबर सौरभ जोशीने इथेनॉल मिश्रित (E20) पेट्रोलवर उपस्थित केले प्रश्न
पुढील बातमी
पाटण तालुक्यातील ९ गावांतील ५५८ घरकुलांचे पुनर्वसन डिसेंबर अखेर पूर्ण करा - पालकमंत्री शंभूराज देसाई

संबंधित बातम्या