फलटण : विठूरायाचे दर्शन घेऊन पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने निघालेल्या बीड जिल्ह्यातील वडवणी येथील वारकऱ्यांच्या दिंडीवर फलटण तालुक्यातील वडजलजवळ हल्ला करण्यात आला. यामध्ये दिंडीचालकाला मारहाण करण्यात आली. ही धक्कादायक घटना पुणे-पंढरपूर महामार्गावरील वडजलजवळील काशीदवाडी फाट्याच्या परिसरात ५ जुलैच्या मध्यरात्री घडली होती. या हल्ल्यात दिंडीचालक त्रिंबक कोळेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून, त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
वडवणी (जि. बीड) येथील वारकरी दिंडी पंढरपूरहून आळंदीकडे प्रवास करत असताना काशीदवाडी फाट्याजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये विश्रांती व जेवणासाठी थांबली होती. यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी दिंडीवर दगडफेक केली. दिंडीचालक त्रिंबक कोळेकर यांना मारहाण केली; तसेच सुमारे ७० हजार रुपयांची रोकड लुटल्याचा आरोप वारकऱ्यांनी केला आहे.
या घटनेनंतर रात्री उशिरा पोलिस घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, वारकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात कोणताही गुन्हा नोंदवला नाही. उलट, ‘इथून निघून जा, गाडीची हवा सोडली असती तर काय झाले असते?’ अशा प्रकारची भीती दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप वारकऱ्यांकडून करण्यात आला आहे.
अज्ञातांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्यानंतरही दिंडीचालक त्रिंबक कोळेकर यांनी वारीचा पुढील प्रवास सुरू ठेवला आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने वारकरी समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.