सातारा : कवित्सु कंपनीचे वरिष्ठ अधिकारी असलेल्या रमेश जगदाळे (वय- ६५, कल्पना हौसिंग सोसायटी, शाहुपुरी) यांना महामार्गालगत मिक्सर ट्रकने पाठीमागून धडक दिली. त्यात ते जबर जखमी होऊन पडले असताना ट्रक चालक प्रतिक जाधव हा निघून गेला. दरम्यान काही जणांनी त्यांना सातारा डायग्नोस्टीक येथे उपचारासाठी दाखल केले असता १६ दिवस उपचार सुरू असताना त्यांचे बुधवार दि.२५ रोजी दुपारी निधन झाले.
दि.८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ च्या दरम्यान रमेश जगदाळे हे कविस्तु कंपनीतून ड्युटी वरून सुटल्यावर शाहुपुरी येथील आपल्या घरी स्कुटी एम एच ११बीसी ३१८१ वरुन निघाले होते.राष्ट्रीय राजमार्ग वरील हुंडाई शोरुम समोर ते जात असताना भरधाव जाणाऱ्या मिस्कर ट्रक एम एच वाय ९१६२ ने पाठीमागून धडक दिली. त्यांच्या खांद्याला जबर मार लागून ते रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना ही ट्रक चालक प्रतिक जाधव हा त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता वाहन घेऊन फरार झाला.
यावेळी जाणाऱ्या काही जणांनी त्यांना ओळखले असता त्यांच्या नातेवाईकांना कळविले तसेच सातारा डाग्नोस्टीक येथे उपचारासाठी दाखल केले. दरम्यान शहर पोलिस स्टेशनच्या अपघात मदत कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित ट्रक आणि चालकास शोधून ताब्यात घेऊन चौकशी करून सोडून दिले.
रमेश जगदाळे यांनी शुध्दीवर आल्यावर अपघाताची, ट्रक बाबत माहिती कुटुंबांना सविस्तर दिली. उपचार सुरू असताना दोन दिवसांपूर्वी प्रकृती चिंताजनक होऊन दि.२५ डिसेंबर रोजी दुपारी तीन च्या दरम्यान त्यांचे निधन झाले.
याबाबत शहर पोलीसात पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या आदेशाने आणि रमेश जगदाळे यांचा मुलगा निखिल जगदाळे यांने दिलेल्या माहितीवरून विविध कलमांर्तगत संबंधित ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.