सातारा : नैसर्गिक वरदान लाभलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा परिसरात दुर्गम व अती दुर्गम भागामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी खर्ची टाकला जातो. परंतु निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे त्याचा स्थानिकांना कोणताही लाभ होत नाही. अशा निकृष्ट दर्जाच्या काम करणार्या ठेकेदारांना अभय देणार्या अधिकार्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी समन्वय समिती महाबळेश्वरचे अध्यक्ष धोंडीबा धनावडे यांनी सातारा येथे पत्रकारांशी बोलताना केली आहे.
महाराष्ट्राचे नंदनवन ठरलेल्या महाबळेश्वरच्या थंड हवेच्या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात. या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी केंद्र व राज्य शासनाने अनेक विधायक उपक्रम राबवले आहेत. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी या भागातील दरे तांब गावचे सुपुत्र आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या निवडीने या भागाला अति महत्व प्राप्त झाली आहे तर दुसर्या बाजूला निकृष्ट दर्जाच्या कामांना अभय देणार्या अधिकार्यांमुळे निधी वळवला जात असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.
वास्तविक पाहता तापोळा - महाबळेश्वर रस्त्यावरील भीम नगर ते झोळाची खिंड या 6 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची निकृष्ट दर्जाची कामे अधिकारी लेखी खुलाशात मान्य करतात आणि रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहून गेल्यामुळे खराब झालेल्या डांबरी पृष्ठभागाच्या दुरुस्तीचे चालू प्रगतीत असलेल्या कामासमवेत खुलासाही करतात. म्हणजे एकीकडे दुर्लक्ष करायचं आणि दुसरीकडे तेही मान्य करायचं, या बाबींमुळे या ठिकाणी खूप मोठी तफावत दिसून येत आहे. त्याचबरोबर आकल्पे, मेट सिद्धी ते सातारा जिल्हा रस्ता खराब झालेला आहे. रस्त्याच्या बाजूच्या संरक्षक भिंतींना तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता धोकादायक स्थितीत दिसून येत आहे.
प्रतापगड, कुंभरोशी, कळमगाव, तापोळा, अहिर रस्ता याबाबतही लेखी तक्रार देऊन सुद्धा त्याकडे जाणीवपूर्वक सार्वजनिक बांधकाम उपविभाग अभियंता दुर्लक्ष करत आहेत. ही बाब लोकशाहीला घातक असून याबाबत दिलेल्या निवेदनाचा अडीच ते तीन महिने विचार केला जात नाही. एकंदरीत निकृष्ट दर्जाची कामे करणार्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, अशी मागणी केल्यानंतर त्यांना पुन्हा चार दोन नवीन कामे दिली जातात.
एवढे मोठे अर्थकारण आहे. पूर्वी टक्केवारी दिली जात होती, आता कामातच भागीदारी दिली जाते, अशी चर्चा आहे. याबाबत एस.आय.टी.मार्फत चौकशी करून संबंधित अभय देणार्या अधिकार्याच्या संपत्तीची चौकशी करावी. अन्यथा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आमरण उपोषण हे सुरूच राहील, असाही त्यांनी इशारा उपोषण करते धोंडीबा धनावडे व ग्रामस्थांनी दिला आहे. या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत असून तापोळा भागातील अनेक गावचे ग्रामस्थ सहभागी होत आहेत.
त्यामध्ये पांडुरंग कदम, सखाराम सकपाळ, भीमराव कदम, भागू सकपाळ, हरिबा सकपाळ, मारुती कदम, चंद्रकांत सपकाळ, रामचंद्र कदम, आबाजी शेलार, महादेव जाधव, शंकर कदम, रमेश कदम, हरिबा कदम, गणपत कारंडे व हरिबा कारंडे यांच्यासह ज्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे केलेली आहेत. त्या गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाला बसलेले आहेत. महाबळेश्वर तालुक्यामध्ये भ्रष्ट ठेकेदार व भ्रष्ट अभय देणारे अधिकारी असल्यामुळेच खर्या अर्थाने सार्वजनिक बांधकाम विभाग बदनाम होत असल्याची गोपीनीय माहिती सेवानिवृत्त अधिकार्यांनी दिली आहे.