रहिमतपूर : सासुर्वे (ता. कोरेगाव) येथील हुतात्मा जवान हवालदार प्रवीण अंकुश वायदंडे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुणाचल प्रदेशातील चीन सीमारेषेवर देशसेवेचे कर्तव्य बजावताना जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर गुवाहाटीतील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शनिवारी (ता. १६) त्यांची प्राणज्योत मालवली. आज त्यांचे पार्थिव सैन्य दलाच्या ताफ्यासह मूळगावी आणण्यात आले. शासकीय इतमामात व शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हवालदार प्रवीण वायदंडे यांचा अरुणाचल प्रदेशात कर्तव्य बजावत असताना अपघात झाला होता. तत्काळ त्यांना उपचारासाठी गुवाहाटी येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले. रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव सासुर्वे येथे आणण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी परिसरातील हजारो ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
‘अमर रहे, अमर रहे प्रवीण वायदंडे अमर रहे’, ‘वीर जवान तुझे सलाम’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. अंत्यसंस्कारावेळी कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले. वीर जवान प्रवीण वायदंडे यांना त्यांच्या मुलाने मुखाग्नी दिला.
यावेळी आमदार मनोज घोरपडे, तहसीलदार संगमेश कोडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गणेश केंद्रे, मंडल अधिकारी सावंत आदी शासकीय अधिकारी, पोलिस प्रशासन, लोकप्रतिनिधी, माजी सैनिक तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.