राज्यातील ४०४ पर्यटक नेपाळमध्ये सुखरूप, ३३८ जणांशी झाला संपर्क, महाराष्ट्रातील ४५ पर्यटकांचा भारतीय हद्दीत सुरक्षित प्रवेश

by Team Satara Today | published on : 30 August 2026


मुंबई : नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या मदतीसाठी विविध पातळीवर शासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करत आहेत. सर्वजण सुरक्षितपणे त्यांच्या गावी परत पोहोचण्यासाठी सतर्कतेने योग्य नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आत्तापर्यंत प्राप्त माहितीनुसार राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित असून ३३८ नागरिकांशी संपर्क झाला आहे.

राज्यातील ४५ जणांच्या पर्यटकांच्या ग्रुपने शनिवारी भारतीय हद्दीत  प्रवेश केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नाशिक, पुणे , मुंबई व अहिल्यानगर येथील नागरिक नेपाळ येथे गेले होते. महापुराच्या घटनेच्या कालावधीत हे नागरिक चितवन येथे होते. आज काठमांडूकडे जाणारे मार्ग बंद असल्याने नेपाळमधील लुंबिनी मार्गे त्यांना आणण्यात  येत असून अयोध्या पोहोचल्यानंतर पुढील नियोजन शासनाच्या सूचनेनुसार केले जाणार आहे. शिवाय आणखीही काही पर्यटक लवकरच भारतात परतणार असल्याचे समजते.

नेपाळच्या मदतीसाठी कोल्हापुरातील व्हाइट आर्मी रवाना

आपत्कालीन परिस्थितीत मदतीचा हात देण्याची परंपरा कायम ठेवत व्हाईट आर्मी, कोल्हापूर, पुन्हा एकदा नेपाळच्या मदतीसाठी, सरसावली आहे. ‘मिशन नेपाळ २०२६’ अंतर्गत मेडिकल व रिलीफ टीम शुक्रवारी रात्री कोल्हापुरातून नेपाळकडे रवाना झाली. या मोहिमेचे नेतृत्व उज्ज्वल नागेशकर करत आहेत,. त्यांच्या नेतृत्वाखाली डॉ. शशिकांत सातपुते, डॉ. शुभम पाटील, डॉ. कोमल इंदुलकर,, डॉ. राहुल चौगुले, सुधीर गोरे, नितेश वनकोरे, विनायक भाट, निखिल लंबू, शालमोन आवले, अमन धनवडे आणि शंकर कांबळे यांचा समावेश असलेली मेडिकल व रिलीफ टीम नेपाळमधील आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वैद्यकीय तसेच आवश्यक मदत देणार आहे. या मोहिमेसाठी, एस्टर आधार हॉस्पिटलने, महत्त्वपूर्ण योगदान दिले असून,, सुमारे पाच हजार नागरिकांना लाभ होईल एवढे औषधसाहित्य मिशन नेपाळसाठी उपलब्ध करून दिले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अग्निवीरांचा सरकारी सेवेत जाण्याचा मार्ग मोकळा; पोलिस, अग्निशमन, वन विभागात पदे निर्माण केली जाणार
पुढील बातमी
E20 Petrol वर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; नरेंद्र कुमार गोस्वामी यांची याचिका, पेट्रोल पंपाच्या नोजलवर इथेनॉलचे प्रमाण लिहिण्याची मागणी

संबंधित बातम्या