मुंबई : महायुती सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात होणार असून पहिल्याच दिवशी २०२४-२५च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात येणार असल्याने, सत्ताधारी आणि विरोधकांचं लक्ष या पुरवणी मागण्यांवर असणार आहे.
हे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ मार्चपर्यंत सुरू राहणार असून सोमवारी १० मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून कोणत्या घोषणांचा पाऊस पाडण्यात येतो, हा औत्सुक्याचा विषय आहे. तर पुरेसे संख्याबळ हातात नसतानाही राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांवरील अत्याचार आणि मंत्र्याच्या राजीनाम्याबाबत विरोधक नेमकी कोणती भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे हातात बेड्या घालून विधानभवनात दाखल झाले. यावेळी ते म्हणाले की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती जो घाला घातला जात आहे, ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत, ती पद्धत चुकीची आहे. आम्हाला व्यक्त होता आले पाहिजे राईट एक्सप्रेशन राईट टू स्पीच हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे शाबूत राहिले पाहिजेत म्हणून या बेड्या आहेत”, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.