सांगली : विश्रामबाग येथील शंभरफुटी रस्त्यावरील व्हाईट हाऊस हॉटेलच्या बारमध्ये दारू पिताना झालेल्या वादातून निखील रवींद्र साबळे (वय २५, रा. पालवी हॉटेलजवळ, कुपवाड) याचा चाकूने एकाच वारमध्ये गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. रात्री साडे सातच्या सुमारास हा खून झाला. खुनानंतर संशयित मित्र प्रसाद दत्तात्रय सुतार (रा. कुपवाड) हा दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेने पसार झाला. रात्री उशिरापर्यंत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस पथक त्याच्या मागावर होते. आर्थिक वाद किंवा अन्य कारणातून खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
मिळालेली माहितीनुसार, निखील साबळे हा विवाहित तरूण असून पूर्वी लक्ष्मी देवळाजवळ त्याचे आईस्क्रीम पार्लर होते. अलिकडे तो पालवी हॉटेलजवळील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये काम करत होता. आई-वडिल, पत्नी व दोन मुलांसह तो पालवी हॉटेलजवळील अपार्टमेंटमध्ये राहत होता.
संशयित प्रसाद सुतार आणि त्याची ओळख होती. प्रसाद सुतार याचे शंभरफुटी रस्त्यावर व्हाईट हाऊससमोरच ओंकार सर्व्हिसिंग सेंटर आहे. सायंकाळी सातच्या सुमारास तो आणि प्रसाद व्हाईट हाऊसच्या पहिल्या मजल्यावरील बारमध्ये दारू पिण्यास आले होते.
सायंकाळी बार सुरू झाल्यानंतर दोघांशिवाय कोणी ग्राहक नव्हते. दोघांनी कोपऱ्यातील टेबलसमोर दारू पिण्यास सुरूवात केली. काही वेळातच त्यांच्यात वाद झाला. तेव्हा प्रसादने कमरेला लावलेला एका बाजूला दातरे असलेला चाकू बाहेर काढला. निखील याच्या गळ्यावर एकच वार केला. गळ्यावर खोलवर वार झाल्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव होऊन निखीलचा जागीच मृत्यू झाला.
खुनानंतर प्रसाद चाकू कोचवर टाकून बाहेर पडला. दुचाकी घेऊन तो थेट पळाला. बारमध्ये खून झाल्यानंतर वेटर आणि कामगारांची पळापळ झाली. तत्काळ विश्रामबाग पोलिसांना कळवले. पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव आणि पथक घटनास्थळी धावले. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार आणि पथकही दाखल झाले.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
