3 ऑक्टोबर रोजी सातारा येथे जिल्ह्यातील ओबीसी जातींचा एल्गार

सातारा जिल्हा ओबीसी महासंघातर्फे आरक्षण बचाव आक्रोश मेळावा

by Team Satara Today | published on : 26 September 2025


सातारा : अनेकांना नोंदी सापडल्या, कोणाला पुरावे मिळाले, अनेकांना दाखले मिळणार, सव्वा कोटी आता कुणबी होणार, राहिलेले सव्वा कोटी लोक 10% SEBC मधून आरक्षण घेणार, त्यातुन राहिलेले सव्वा कोटी लोक  केंद्राच्या 10% EWS मधून आरक्षण घेणार, सर्वत्र जल्लोष हर्षोउल्हास आणि उन्माद चालू आहे. परंतु ज्या खालच्या जातीतील लोकांच्या ताटातील घास हिसकावून घेतला जाणार आहे त्याचा कोणीच विचार करायला तयार नाही. त्यामुळे 3 ऑक्टोबर रोजी सातारा येथे एसटी स्टँड जवळील काँग्रेस वन मध्ये दुपारी 1 वाजता सातारा जिल्हा ओबीसी जनतेचा आक्रोश मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये ओबीसी जनतेने कमीत कमी येऊन आपला ऊर बडवुन घ्या, मनगटावर चुना लावून बोंबला  आक्रोश करून मन हलके तरी करा, असे आवाहन  सातारा जिल्हा ओबीसी महासंघाने  केले आहे. 

दाद मागण्या शिवाय तुमचा कोणीही वाली राहिलेला नाही

पुढील चार महिन्यांत ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद व विविध स्थानिक संस्थाच्या निवडणुका होणार, या मध्ये ख-या ओबीसी चे हक्क हिरावून घेतले जातील. कुणबी दाखले जोडुन खालच्या जातीतील ओबीसीची हकालपट्टी होणार आहे. ओबीसी 340 जातींना 19% आरक्षण शिक्षण व नोकरीत आहे. एका जातीच्या वाट्याला अर्धा टक्का देखील येत नाही. तो ही घास आता अमानुषपणे हिसकावून घेतला जाणार आहे. त्यामुळे आता समस्त ओबीसी जातींनी स्वतःहून रस्त्यावर उतरणे, आपला आक्रोष व्यक्त करुन दाद मागण्या शिवाय तुमचा कोणीही वाली राहिलेला नाही.

करो या मरो हा निर्धार 

खरे तर सर्वच उच्चवर्णीयांमध्ये दहा पंधरा टक्के लोक हे गोरगरीब आहेत त्यांना शिक्षणामध्ये व नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे, त्यांना तेवढे स्वतंत्र आरक्षण द्या. त्याला आमचा पाठिंबा आहे , परंतु राजकीय आरक्षण हे खालच्या जातीतील लोकांना संधी देण्याचा पर्याय आहे आणि तेथे देखील जर हे उच्चवर्णीय ओबीसीला डावलून त्यांचे हक्क हिरावून घेणार त्यामुळे सर्वच ओबीसी समाजात घबराहट पसरली आहे. सद्याच्या परिस्थितीत तर ओबीसी जमातीला कोणीही वाली राहिलेला नाही, त्यामुळे सातारा जिल्हा ओबीसी जातींच्या वतीने करो या मरो हा निर्धार व्यक्त करुन दिनांक 3 ऑक्टोबर ला आक्रोश महामेळावा आयोजित केलेला आहे. ओबीसींच्या एकूण 340 जातींपैकी जेवढ्या जाती सातारा जिल्ह्यामध्ये अस्तित्वात असतील त्या जातींचे कार्यकर्ते यांनी सदर मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आहे, त्याच बरोबर व्हीजेएनटी व एससी एसटी या जातींनी देखील सदर मेळाव्यास उपस्थित राहायचे आहे. 

हा मेळावा ओबीसी, व्हिजेएनटी, एससी एसटी, यांचा एकत्रित मेळावा असेल. मेळाव्यात कोणीही राजकीय नेता असणार नाही.  हा मेळावा सर्वपक्षीय असेल व यात कोणत्याही राजकीय पक्ष अथवा राजकीय नेते यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न न करता, किंवा टिका न करता, आपण समस्त ओबीसी यातून कसे वाचणार, याबाबत चर्चा होणार आहे व पुढील ॲक्शन प्लॅन बद्दल नियोजन होणार आहे. आता करा नाही तर मरा अशी आपली अवस्था झाली आहे. आता रस्त्यावर उतरायची जिद्द ठेवा. त्या दिवशी सर्वांचे विचार ऐकुण पुढील नियोजन होईल. मेळाव्यात येणारा प्रत्येक ओबीसी बांधव हा स्वयंभू स्वतःच नेता असेल आणि सर्वजण वैयक्तिक पातळीवरती निर्णय घेण्यास सक्षम असतील, तरी या मेळाव्यास हजारो च्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन करण्यात येत आहे. आपल्यासाठी कोणीही खर्च करणार नाही याची जाणीव ठेवून येताना बरोबर स्वतःची भाकरी, पिशवीत पाण्याची बाटली व पावसाचे दिवस असल्यामुळे छत्री सोबत घेऊन यावे. कोरोनाच्या काळात अनेक महिने आपण घरात बसून काढले. मेलो नाही. त्यामुळे आता स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांच्या पुढील भविष्यासाठी या आरक्षण बचाव आक्रोश मोहिमेत हजारोच्या संख्येने प्रत्येक ओबीसी जातीने आपल्या विशिष्ट कार्यकर्त्यांना पाठवून सामील व्हावे, असे सातारा जिल्हा ओबीसी महासंघ आवाहन करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यात शेकडो हातांचे हजारो तास श्रमदान
पुढील बातमी
शिक्षण उपसंचालक चोथे रमले कुमारांच्या साहित्यिक भावविश्वात

संबंधित बातम्या