नवनियुक्त जिल्हा परिषद अध्यक्षांचे प्रमाणपत्र 'बोगस' - शशिकांत शिंदेंचा अधिवेशनात घणाघाती आरोप; जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ

by Team Satara Today | published on : 23 March 2026


​मुंबई : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवरून नवा पेच निर्माण झाला असून, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते  प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपच्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जिल्हा परिषदेत भाजपने संख्याबळ नसतानाही सत्तेची गणिते जुळवली असली, तरी अध्यक्षांनी सादर केलेले ओबीसी प्रमाणपत्र बोगस असल्याचा दावा शिंदे यांनी थेट विधीमंडळाच्या सभागृहात केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

​जिल्ह्यात खासदार आणि आमदारांची संख्या वाढल्याने भाजप नेत्यांचा आत्मविश्वास उंचावला असून, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने भाजपने जिल्हा परिषदेवर आपले वर्चस्व सिद्ध केले. मात्र, या निवडीच्या प्रक्रियेवरच शशिकांत शिंदे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आरक्षित पदाचा लाभ घेणे हा लोकशाहीचा अपमान

शिंदे यांच्या मते, जिल्हा परिषद अध्यक्षपदी विराजमान झालेल्या प्रिया शिंदे या मुळात खुल्या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. मात्र, अध्यक्षपदासाठी ओबीसी आरक्षण असल्याने त्यांनी निवडीच्या दिवशीच सकाळी ११ वाजता घाईघाईने ओबीसी प्रमाणपत्र मिळवले. हे प्रमाणपत्र खोट्या माहितीच्या आधारे मिळवण्यात आले असून, एका खुल्या प्रवर्गातील सदस्याने आरक्षित पदाचा लाभ घेणे हा लोकशाहीचा अपमान असल्याची टीका शिंदे यांनी केली. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी त्यांनी सभागृहात लावून धरली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून काय पावले उचलली जातात याकडे  जिल्ह्याचे लक्ष 

​सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने 'स्वबळा'चा नारा दिल्याने त्यांचेच मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेना आणि अजित पवार गटाचे नेते दुखावले गेले होते. मंत्री मकरंद पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी महाविकास आघाडीशी हातमिळवणी करून बहुमताचा आकडा गाठण्याचा प्रयत्न केला होता. ६५ जागांपैकी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ३५ जागांचे समीकरण विरोधकांकडे असतानाही, भाजपने 'ऑपरेशन लोटस' राबवत ३० विरुद्ध ३३ मतांनी विजय मिळवला. या घडामोडींमुळे महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये मोठा दुरावा निर्माण झाला असून, आता ओबीसी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून भाजला घेरण्याची रणनीती राष्ट्रवादीने आखली आहे. खटाव तालुक्यातील डॉ. प्रिया शिंदे यांच्या निवडीवर झालेल्या या आरोपांमुळे आता जिल्हा प्रशासनाकडून काय पावले उचलली जातात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खत गुणवत्तेच्या अहवालासाठी ५० हजारांची लाच घेताना सातारा येथील कृषी अधिकारी जाळ्यात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
पुढील बातमी
जिल्हा परिषदेत झालेल्या लोकशाहीच्या अवहेलनाविरोधात महिला संघटनांचा हल्लाबोल

संबंधित बातम्या