कोयना-कृष्णा नदीतील पाण्याची पातळी घटली; कराड शहराला आता दिवसातून एकदाच पाणीपुरवठा

नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची पत्रकार परिषदेत माहिती; तीव्रता वाढण्यापूर्वीच उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी निर्णय

by Team Satara Today | published on : 29 October 2026


कराड : कोयना-कृष्णा नदीतील पाण्याची पातळी घटल्याने उपलब्ध पाणीसाठ्यावर मर्यादा येत आहेत. त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होत आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा दिवसातून दोनऐवजी एकदाच करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. शुक्रवारपासून (दि. ३०) हा बदल लागू होईल, अशी माहिती नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, दिवाळीच्या आदल्या दिवसापर्यंत (चार नोव्हेंबर) हा बदल लागू असेल. दिवाळीनंतर १२ नोव्हेंबरपासून पुन्हा एकवेळ पाणी दिले जाईल. शहराच्या भौगोलिकतेनुसार काही भागांत एक, तर काही भागांत दीडतास पाणी दिले जाईल. त्यातही काही भागांत सकाळी, तर काही भागांत सायंकाळी पाणीपुरवठा होईल.
पत्रकार परिषदेत उपाध्यक्ष प्रतापराव साळुंखे, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, पाणीपुरवठा सभापती अल्ताफ शिकलगार, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर उपस्थित होते.
पाणीटंचाईची तीव्रता वाढण्यापूर्वीच उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी निर्णय घेतल्याचे सांगून नगराध्यक्ष यादव म्हणाले, ‘शहराची लोकसंख्या ९० हजार ८५५ आहे. दररोज येणाऱ्या सुमारे २५ हजार नागरिकांची वर्दळ लक्षात घेता शहराची लोकसंख्या सुमारे एक लाख १५ हजारांवर पोचते. त्या लोकसंख्येसाठी पालिका दररोज २१.०६ एमएलडी म्हणजेच, दोन कोटी १६ लाख लिटर पाणीपुरवठा करते. त्यासाठी वारुंजीतील जॅकवेलमधून सुमारे १८ तास पंपिंग करावे लागते.
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने कोयना नदीपात्रातील पाण्याची पातळी घटली आहे. त्यामुळे जॅकवेलमधील पंपांचा पाणी उपसा कमी झाला आहे. शहराची गरज भागताना अडचणी येत आहेत. जलसंपदा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्यात किमान १० टक्के कपातीचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पालिकेला पुरवठ्याच्या वेळेत बदलासह एकवेळ एक तासच पाणी देण्याचे नियोजन केले आहे.
श्री. यादव म्हणाले, ‘नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. शहरातील कूपनलिका, विहिरी, अन्य जलस्रोतांची माहिती संकलित केली जात आहे. संभाव्य टंचाईवेळी पर्यायी व्यवस्थेची तयारी केली आहे. पालिकेला गरज भासल्यास पिण्याच्या पाण्याच्या टँकरची अतिरिक्त सोयही करण्यात येणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराडमध्ये मृत कासवाजवळ जमलेल्या 35 पक्ष्यांचा काही मिनिटांतच मृत्यू झाल्याने खळबळ; विषबाधा की आणखी काही, वनविभाग सतर्क
पुढील बातमी
सातारा आकाशवाणीवर १ नोव्हेंबरपासून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बसवेश्वर चेणगे यांचे ‘चिंतन’

संबंधित बातम्या