विद्युत तार अंगावर पडून उसतोड मजूर ठार

विडणी येथील घटना; तीन एकरमधील उस जळाला

सातारा : फलटण तालुक्यातील विडणी येथील २६ फाटा दहाबिघे येथे ऊसाच्या शेतात ऊसतोड २२ किलो वॅट मुख्य विद्युत तार तुटून अंगावर पडल्याने उसतोड मजूर जागीच ठार झाला. शॉर्टसर्किटने उसाच्या शेताने पेट घेतल्याने तीन एकरातील उस जळाला. उसतोड वाहने वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत उसतोड मजूर सुभाष ऊखा गायकवाड वय ४५ असे मृत झालेल्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री सातच्या दरम्यान घडली. 

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहीती अशी की, दहाबिघे २६ फाटा येथे फलटण येथील एका खासगी साखर कारखान्याची ऊसतोड खंडू शेंडे याच्या शेतात सुरु होती. या दरम्यान ऊसतोड करणारा मजूर सुभाष ऊखा गायकवाड वय ४५ रा.आंबा ता.कन्नड, जि संभाजी नगर यांच्या अंगावर २२ केव्हीची मेन लाईनची तार अचानक तुटुन अंगावर पडल्याने ऊसतोड मजूराचा जागीच मृत्यू झाला. 

या ऊसाच्या शेतात ऊसतोड करणारे महिला पुरुष लहान मुले अशी जवळ पास २०/२५ मजूर होते तर ५ बैल जोड्या होत्या. बैलगाडी ऊसाची ट्राँली ट्रँक्टर उभे होते. शॉर्टसर्कीटने ऊसाच्या शेतात ऊसाच्या पाचटीमुळे पेट घेतला. घटनेचे गांभिर्य ओळखून ऊसतोड मालक नितीन नारायण पवार यांनी सर्व ऊसतोड मजूर बैलगाडी, बैल ट्रँक्टर बाहेर सुरक्षीत स्थळी बाहेर काढल्याने मोठी जिवीतहानी वाचली.

२२ केव्ही मेन लाईन तुटून ऊसाने पेट घेऊन ऊसतोड मजूर जागीच मृत्यू झाल्याची माहीती महावितरण अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर विजेचा सप्लाय  बंद करण्यात आला. घटनास्थळी महावितरणचे अधिकारी, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. ऊसतोड मजूराचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे शवविच्छेदन करणेत आले असून महावितरण कडून तातडीची वीस हजार रुपयांची  मदत करण्यात आली असून बाकीची नुकसान भरपाई लवकरच दिली जाईल, असे महावितरणचे कार्यकारीअभियंता प्रदीप ग्रामोपाध्दे यांनी सांगितले. याबाबतची फिर्याद फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात बाबुलाल पवार यांनी दिली आहे.

मागील बातमी
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा
पुढील बातमी
ऑनलाइन वीजबिल भरा; स्मार्ट फोन, स्मार्टवॉच जिंका!

संबंधित बातम्या