झाशीमध्ये प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वेवर दगडफेक

by Team Satara Today | published on : 28 January 2025


झाशी : उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. फक्त देशामध्ये नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कोट्यवधी नागा सांधूंनी अमृत स्नान केले आहे. 45 दिवसांच्या या महाकुंभ मेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने पूर्ण तयारी केली आहे. मात्र झाशीमध्ये प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वेवर दगडफेक करण्यात आली आहे. झाशीहून प्रयागराजकडे निघालेल्या विशेष रेल्वेवर जमावाकडून दगडफेक आणि हल्ला झाल्याची माहिती आता समोर येत आहे. काही समाजकंटकांनी ट्रेनवर हल्ला करत खिडक्यांच्या काचा फोडल्या आणि दगडफेक केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे भाविकांमध्ये एकच भीतीचे वातावरण आहे.

144 वर्षांनंतर महाकुंभमेळा भरला जातो. यासाठी भारतीय रेल्वेने विशेष गाड्या देखील सोडल्या आहेत. देशभरातून भाविक आणि इच्छुक प्रयागराजकडे रवाना होत आहेत. मात्र झाशीमधून प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वेगाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, झाशीहून प्रयागराजला जाणाऱ्या गाडी क्रमांक 11801 या ट्रेनवर दगडफेक झाल्याची माहिती मिळत आहे. हरपालपूर रेल्वे स्थानकावर प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. मात्र विशेष ट्रेनच्या आत उपस्थित असलेल्या प्रवाशांनी दरवाजे उघडले नाहीत. यामुळे स्थानकावर उपस्थित असलेल्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त करत दगडफेक करत तोडफोड सुरू केली. यामुळे ट्रेनच्या आत बसलेल्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे.

या प्रकरणामध्ये, काल (दि.27) रात्री 08 वाजता ही ट्रेन झाशीहून निघाली होती. रात्री 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास हरपालपूर स्थानकावर काही समाजकंटकांनी ट्रेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र आतील प्रवाशांनी वेळीच दरवाजे आतून बंद केले, अशी माहिती काही प्रवाशांनी व्हिडीओद्वारे दिली आहे. पोलिसांनी याआधारे आता चौकशी सुरू केली आहे.

छत्रपूर रेल्वे स्थानकावरही अशाचप्रकारची घटना घडली आहे. हरपालपूरप्रमाणेच छत्रपूर स्थानकावरही प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. सीव्हील लाईन्स पोलीस ठाण्याचे प्रमुख वाल्मिकी दुबे यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनमधील प्रवाशांनी आतून दरवाजे बंद करून घेतल्यामुळे स्थानकात गोंधळ निर्माण झाला. केवळ एका माणसाने दगडफेक करून तिथून पळ काढला. प्रयागराजकडे जाणाऱ्या रेल्वेवर हल्ले केले जात असल्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. न्यूज १ इंडिया याने या रेल्वेवरील दगडफेकीची व्हिडिओ शेअर केला आहे.

प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात सेक्टर 19-20 मध्ये आग लागली होती. विवेकानंद सेवा समिती वाराणसीच्या टेंटमध्ये जेवण बनवताना ही आग लागली. आग कशी लागली, त्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ही आग वेगाने पसरली. त्यामुळे आसपासचे तंबू यामध्ये जळून खाक झाले. या टेंटमध्ये ठेवलेल्या सिलेंडरचे ब्लास्ट झाले. जवळपास 20 ते 25 तंबू या आगीत जळाले. ही आग गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे झाल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली होती. मात्र नंतर हा हल्ला खालिस्तानी संघटनेने घेतली आहे. कुंभमेळ्यामध्ये लागलेली आगीच्या घटनेची खालिस्तान जिंदाबाद फोर्स (KZF) या दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळे महाकुंभमेळ्याबाबत सुरक्षेची मोठी काळजी घेतली जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
निष्णात वकील ॲड. निलेश तपासे यांचे निधन
पुढील बातमी
‘कोरेगाव-फलटण’ रेडेघाट मार्गाची पाहणी करून आराखड्यासह अंदाजपत्रक तयार करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

संबंधित बातम्या