खंडाळा तालुका शेतकरी सहकारी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये नाट्यमय घडामोडी; जपच्या पाच जणांच्या अपिलाचा निर्णय राखून ठेवला

by Team Satara Today | published on : 07 November 2026


शिरवळ : खंडाळा तालुका शेतकरी सहकारी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व नाट्यमय घडामोडी निर्माण झाल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध साखर आयुक्त कार्यालयातील साखर संचालक (प्रशासन) यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या भाजपच्या पाच जणांच्या अपिलाचा निर्णय साखर संचालक डॉ. केदारी जाधव यांनी राखून ठेवला. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
दत्तात्रय गाढवे, दिनेश ढमाळ, राहुल घाडगे, बापूराव धायगुडे यांच्या अर्जांवर निर्णय राखून ठेवला आहे. म्हावशी, ता. खंडाळा येथील खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक २०२६-२७ ते २०३१-३२ या कालावधीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या चुरशीने तब्बल ११३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यानंतर उमेदवारी अर्ज छाननीमध्ये ३७ उमेदवारी अर्ज व दुबार ३, असे चाळीस उमेदवारी अर्ज छाननीमध्ये नामंजूर केले होते.
त्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रगती बागल, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रीती काळे, अनिल क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले दत्तात्रय गाढवे, दिनेश ढमाळ, राहुल घाडगे, बापूराव धायगुडे यांचे २ उमेदवारी अर्ज असे ५ अर्ज हे शासनाच्या लगतच्या पाच गाळप हंगामापैकी आवश्यक ३ गाळप हंगाम कारखान्याचे ऊस घालण्याचे बंधन पाळले नसल्याचे कारण देत उमेदवारी अर्ज छाननीमध्ये नामंजूर केले होते. त्यामुळे दत्तात्रय गाढवे, दिनेश ढमाळ, राहुल घाडगे, बापूराव धायगुडे यांनी साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य कार्यालयातील साखर संचालक (प्रशासन) डॉ. केदारी जाधव यांच्याकडे अपील दाखल केले. त्यानंतर संबंधित प्रवर्गातील उर्वरित उमेदवार, निवडणूक निर्णय अधिकारी, कार्यकारी संचालक यांना साखर संचालक यांच्याकडून सुनावणी कामी हजर राहण्याची नोटीस बजावली होती.
त्यानुसार पुणे येथे साखर संचालक (प्रशासन) डॉ. केदारी जाधव यांच्यासमोर अपीलदार दत्तात्रय गाढवे, दिनेश ढमाळ, राहुल घाडगे, बापूराव धायगुडे यांच्यावतीने सातारा येथील ॲड. खोत, ॲड. चिन्मय पंडित यांनी तर जाबदार यांच्यातर्फे कोल्हापूर येथील ॲड. शहा, सातारा येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे कायदेशीर सल्लागार ॲड. गजेंद्र मुसळे यांनी युक्तिवाद केला.
यावेळी दोन्ही बाजूकडील युक्तिवाद व कागदपत्रांचे अवलोकन केल्यानंतर साखर संचालक (प्रशासन) डॉ. केदारी जाधव यांनी अपिलाचा निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे साखर संचालक (प्रशासन) डॉ. केदारी जाधव यांच्या निर्णयाकडे संपूर्ण खंडाळा तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. गुरुवार दि. १२ नोव्हेंबर रोजी खंडाळा तालुका शेतकरी साखर कारखान्याचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार कि निवडणूक लागणार याबाबत विविध चर्चेला उधाण आले आहे.
सध्यातरी राजकीय हालचालींना वेग आला असून, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, मंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार मदन भोसले, संस्थापक ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे हे निवडणुकीबाबत कोणती भूमिका घेतात, हे उमेदवारी अर्ज माघारीनंतर स्पष्ट होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बेळगावात सरसेनापती तळबीडचे सुपुत्र हंबीरराव मोहिते यांचा अश्वारुढ पुतळा विराजमान! ‘मराठा लाईट इन्फन्ट्री'त पुतळ्याचे अनावरण
पुढील बातमी
न्यायालयीन कामात मदत करण्यासाठी ४ हजाराची लाच घेताना फलटणमध्‍ये वकिलासह दोघे जाळ्यात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

संबंधित बातम्या