सातारा : शाहूपुरी चौकातील वेगवेगळ्या कारणास्तव झालेली सहा शेडची अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारी रात्री कारवाई करून हटवली. येथील रस्ता दीड मीटर रुंद करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत होणार असल्याचे बांधकाम विभागाच्या सूत्रांनी सांगितले. रात्री अडीच तास ही कारवाई सुरू होती. या कारवाईमध्ये नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेत बांधकाम विभागाला सहकार्य केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने मोळाचा ओढा, शाहूपुरी चौक ते पुढे खिंडी मार्गे जाणारा मेढा रस्ता रुंद करण्याचे काम सुरू केले आहे. शाहूपुरी चौकामध्ये प्रमाणापेक्षा जास्त अतिक्रमणे झाल्याने येथील वाहतुकीला अडथळा येत होता. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने येथील अतिक्रमण करणार्यांना दीड महिन्यापूर्वी नोटीस बजावण्यात आल्या होत्या. नागरिकांनी स्वतःहून येथील अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र नागरिकांकडून तसेच अतिक्रमण धारकांकडून कोणताही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शुक्रवारी रात्री साडेआठच्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पंधरा कर्मचार्यांचे पथक जेसीबी, डंपर असा लवाजमा घेवून घटनास्थळी दाखल झाले. तेथे शाहूपुरी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. येथील नागरिकांना परत एकदा स्वतःहून अतिक्रमण काढण्याचे आवाहन करण्यात आले. सुमारे दोन तास ही कारवाई सुरू होती. येथील सहा शेडचे अतिक्रमण तात्काळ हटवण्यात आले. त्यामुळे येथील रस्ता वाहतुकीसाठी मोठा झाला आहे. काही व्यापार्यांनी कर्मचार्यांशी चर्चा करून आपली बाजू रेटण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रस्तावित रस्त्याचे मोजमाप घेऊनच बांधकाम विभागाचे अधिकारी उभे होते. त्यामुळे संबंधितांचा नाईलाज झाला. नागरिकांनी येथील अतिक्रमणे स्वतःहून काढून घेतली. मोळाचा ओढा, शाहूपुरी पोलीस स्टेशन, शाहूपुरी चौक, खिंड मार्गे मेढा शहराकडे जाणारा रस्ता रुंद करण्यात येत आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणे काढण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता प्रशांत खैरमोडे यांनी दिली.