सातारा, दि. 11 : कोयनानगर येथील नेहरु उद्यान सुस्थितीत नाही. या उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी तसेच अजिंक्यतारा किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
पालकमंत्री कार्यालयात विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल अहिरे आदी उपस्थित होते.
कोयनानगर येथील नेहरु उद्यान हे जलसपंदा विभागाच्या 9 एकर जागेत आहे. नेहरु उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी जलसंपदा विभागाकडून ना हकरत प्रमाणपत्र घ्यावे, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई यांनी उद्यानाचा सुशोभीकरणाचा आराखडा पाहून मान्यता दिली. आराखड्याच्या प्रस्ताव मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या हाय पॉवर कमिटीकडे तातडीने प्रस्ताव सादर करावा. याला मान्यता दिली जाईल. या सुशोभीकरण कामासाठी पर्यटन विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ल्याच्या सुशोभीकरणाचा आढावा घेताना पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, सुशोभीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. अजिंक्यतारा किल्ला लिंब खिंड व खिंडवाडी येथून रात्रीचा ठळकपणे दिसला पाहिजे. यासाठी सौर ऊर्जैचा वापर करावा. प्रतापगड पुर्वीच्या काळात जसा होता त्याच पद्धतीने संर्वधनाचे काम सुरु आहे. आता प्रतापगडावरील तळ्यांमध्ये नैसर्गिकरित्या झऱ्यांमधून पाणी कसे येईल यासाठी काम करावे, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.
या बैठकांनंतर पालकमंत्री श्री. देसाई यांनी पाटण तालुक्यातील बोर्गेवाडी पुनर्वसनाबाबत आढावा घेतला.