बीड : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गुंडागर्दी अन् गुंडाराज असल्याचे वास्तव समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला जबर मारहाण करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. या महिला वकिलाला गावातल्याच सरपंचासह इतर काही माणसांकडून काठ्या आणि पाईपने जबर मारहाण करण्यात आली आहे. या जबर मारहाणीनंतर या वकील महिलेचं अंग काळंनिळं पडलं आहे. लाऊडस्पीकर लावू नये, अशी तक्रार केल्यानं या महिला वकिलाला अशी जबर मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरासमोरील गिरणी आणि लाऊड स्पीकर बंद करा अशी विनंती या वकील महिलेकडून गावातील सरपंचाकडे करण्यात आली होती. यानंतर सरपंचाकडून यासंदर्भात टाळाटाळ करण्यात आली. इतकंच नाहीतर त्यांच्याकडून या महिलेला पोलिसांत तक्रार कर असे सांगितले गेले. यानंतर महिलेला सतत त्रास होत असल्याने तिने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर संतापलेल्या सरपंचासह गावातील काही पुरूषांनी या महिलेला एका शेतात नेत रिंगण करून अमानुष मारले. यावेळी महिलेला मारण्यासाठी काठ्या आणि जेसीबी पाईपचा वापर करण्यात आला. तर या महिलेचे अंग काळंनिळं होईपर्यंत निर्दयीपणे तिला मारण्यात आल्याचे सांगितले जात आहे.