कराड, दि. ८ : वाद मिटवण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीतच दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी झालेल्या दगडफेकीत काहीजण जखमी झाले. शहरातील कोष्टी गल्लीत रविवारी सायंकाळी झालेल्या या घटनेप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरून तेराजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती गणेश व नवरात्र उत्सव मंडळातील क्रांतीकुमार दिनकरराव मोरे (रा. दिवटे गल्ली, कराड) याने दिलेल्या तक्रारीवरून देवांग गणेश मंडळातील युवराज पांडुरंग मर्ढे, सुभाष प्रल्हाद वेदपाठक, रमेश प्रल्हाद महादर, अमोल जगन्नाथ मर्ढे, संजय शामराव जाधव (सर्व रा. कोष्टी गल्ली रविवार पेठ, कराड) यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर देवांग गणेश मंडळाचे युवराज मर्ढे याने दिलेल्या तक्रारीवरून क्रांतीकुमार मोरे, आप्पासाहेब बबन खोत, अमित मुकुंद नलावडे, संकेत हनुमंत पवार, विनोद हनुमंत भिंताडे (सर्व रा. दिवटे गल्ली, रविवार पेठ, कराड) यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी अनंत चतुर्दशीला देवांग गणेश मंडळ आणि छत्रपती गणेश मंडळाचे कार्यकर्ते रविवार पेठेतील पाण्याच्या टाकी परिसरात आमनेसामने आले होते. दोन्ही मंडळाच्या मिरवणुका सुरू असताना क्रांतीकुमार मोरे याचा युवराज मर्ढे याला धक्का लागला आणि त्यानंतर वाद सुरू झाला होता. मात्र काही वेळातच वादावर पडदा टाकण्यात आला. दोन्ही मंडळाच्या विसर्जन मिरवणुका पुन्हा सुरू झाल्या होत्या. विसर्जन मिरवणुकीवेळी झालेल्या या वादानंतर रविवारी दुपारी देवांग गणेश मंडळ परिसरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. हा वाद कायमचा मिटवण्यासाठी दोन्ही मंडळातील पदाधिकारी उपस्थित राहिले होते. बैठकीत चर्चा सुरू असतानाच चर्चेसाठी उपस्थित असणाऱ्या एकाने वीट फेकून मारली आणि सुदैवाने ही वीट भिंतीवर आपटल्याने अनर्थ टळला. मात्र त्यानंतर पुन्हा वादाला सुरुवात झाली. या वादावेळी दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या मारहाणीत काही जण जखमी झाले होते.