दहिवडी : माण तालुक्यातील मोही येथील एका दूध संकलन केंद्रामध्ये शेतकऱ्यांकडून जमा झालेले दूध निकृष्ट दर्जाचे असल्याने मुख्य डेअरीचे दूध संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हे दूध स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे संकलन करणाऱ्या स्थानिक केंद्रचालकांनी हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतून दिल्याचा प्रकार उघडकीस आला.
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. माण तालुक्यातील मोही येथील एका नामवंत डेअरीचे दूध संकलन करणाऱ्या स्थानिक केंद्रचालकांनी दीड ते दोन हजार लिटर दूध रस्त्याच्या कडेला ओतून दिल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
मोही गावामध्ये एका दूधसंकलन केंद्रांमध्ये परिसरातील ५ ते ६ गावांतील शेतकऱ्यांकडून रोज हजारो लिटर दूध संकलित केले जाते. संकलित झालेले दूध घेण्यासाठी आलेल्या मुख्य डेअरीच्या कर्मचाऱ्यांना जमा झालेले दूध शिळे-ताजे असे एकत्रित असल्याचे आढळून आले. यावेळी संबंधित डेअरीच्या कर्मचाऱ्यांनी दुधाच्या दर्जाची तपासणी केली असता ८.३ च्या खाली फॅट आढळून आल्याने संकलित केलेले दूध शासनाने निर्धारित केलेल्या प्रतीचे नसल्याचे सांगून मुख्य डेअरीच्या कर्मचाऱ्यांनी दूध स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर शेतकऱ्यांकडून जमा केलेल्या हजारो लिटर दुधाचे कॅन स्थानिक दूध संकलन करणाऱ्या केंद्रचालकांनी मोही परिसरात रस्त्यालगत ओतून दिले.
शिळे व ताजे दूध एकत्र केल्याने नाकारले
शेतकऱ्यांनी सकाळी व सायंकाळी काढलेले दूध एकत्र करून आणू नयेे, अशा सूचना संबंधित दूधसंकलन केंद्रचालकांनी शेतकऱ्यांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी शिळे-ताजे दूध एकत्रित करून दिले असले तरी मुख्य डेअरीने ते नाकारल्याने स्थानिक दूधसंकलन करणाऱ्या केंद्रचालकांना त्याचा आर्थिक भुर्दंड बसला आहे. दरम्यान, हजारो लिटर दूध ओतून देण्याच्या प्रकाराने शेतकऱ्यांसह दूधसंकलन करणाऱ्या संस्थांमध्ये खळबळ माजली आहे.