९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी स्मरणिका संपादन समिती गठीत

by Team Satara Today | published on : 18 August 2025


सातारा : राजधानी साताऱ्यात तब्बल ३२ वर्षानंतर ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. मसाप शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशनच्या वतीने हे संमेलन होणार असून त्याची जोरदार तयारी सुरु आहे. साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी स्मरणिका संपादन समितीचे गठण करण्यात आले आहे.  ९९ व्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ही समिती गठीत केली आहे. संमेलनाच्या ९९ वर्षाच्या इतिहासात प्रथमच स्मरणिका संपादन समितीमध्ये साहित्य क्षेत्रातील प्रतिनिधींबरोबरच विविध वृत्तपत्रांच्या संपादकांना संधी देण्यात आल्याची माहिती ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली.

साताऱ्यात मसाप शाहूपुरी शाखेच्या १२ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर काही दिवसांपूर्वीच ९९ वे संमेलन साताऱ्यात होणार असल्याचे जाहीर झाले होते. तब्बल ३२ वर्षांनी होणाऱ्या या संमेलनामुळे सातारा जिल्हावासियांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संमेलनाच्या तयारीने वेग घेतला असून विविध संस्थासमवेत बैठकाही झाल्या आहेत. संमेलनाचे नियोजन नेटके आणि वैशिष्टयपूर्ण व्हावे यासाठी विविध समित्या तयार करण्याचे काम सुरु आहे. नुकतेच मार्गदर्शन समिती जाहीर करण्यात आली आहे. आता ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्मरणिका संपादन समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे मुख्य समन्वयक डॉ. उमेश करंबेळकर हे असून विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंत मार्गदर्शक आहेत. समितीच्या सदस्यांमध्ये प्रथमच साहित्य क्षेत्रातील प्रतिनिधींसमवेत विविध वृत्तपत्रांच्या संपादकांना स्थान देण्यात आले आहे. 

या समितीच्या सदस्यांमध्ये हरिष पाटणे, राजेश सोळस्कर, हनुमंत पाटील, श्रीकांत कात्रे, मुकुंद फडके, ज्योत्सना कोल्हटकर, प्रा. देवानंद सोनटक्के, गजानन चेणगे, विश्वास पवार, सुनील शेडगे यांचा समावेश आहे. स्मरणिका समितीचे गठण झाल्यानंतर रविवार सर्व सदस्यांची बैठक झाली आहे. या बैठकीत पुढील आठ दिवसात स्मरणिका कशाप्रकारची असावी, त्यात काय काय समाविष्ट असावे, त्याची रचना कशी असावा याचा प्रारुप आराखडा तयार करण्याचे ठरवण्यात आले. आठ दिवसानंतर प्रारुन आराखडा तयार झाल्यानंतर समितीतील सर्वांची मते विचारात घेऊन स्मरणिकाचा आराखडा अंतिम करुन त्याचे काम सुरु करण्याचेही ठरवण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
21 ऑगस्ट पासून सातारा जिल्हा महसूल कर्मचारी यांचे बेमुदत लेखणी बंद आंदोलन
पुढील बातमी
सातारा पालिका सभागृहात लागले प्रभागनिहाय रचनेचे नकाशे

संबंधित बातम्या