'कास पठार'वरील फुलांचा हंगाम लांबणार?

by Team Satara Today | published on : 29 August 2024


कास : श्रावणाच्या आगमनानंतर काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने नंतर मात्र तुफान बॅटिंग चालू केली आहे. त्यामुळे फुलांसाठी पोषक झालेले वातावरण पुन्हा बदलले आणि सर्वांच्या प्रतीक्षेत असलेला कासचा फुलोत्सव काही दिवसांसाठी पुन्हा लांबवावा लागला असून, पाऊस कधी विश्रांती घेईल आणि त्यानंतर फुलांचे प्रमाण पाहून हंगाम सुरू करण्याचा निर्णय पठाराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कास कार्यकारी समितीमार्फत घेतला जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांना फुलांचा आनंद घेण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

पावसाळा सुरू झाला, की कास परिसरातील पर्यटन बहरते. जून महिन्यापासूनच पर्यटकांची पावले कासकडे वळतात. सुरुवातीला कास परिसरातील एकीव धबधबा, भांबवली वजराई धबधबा, कास तलाव आदी ठिकाणांना पर्यटक भेट देत असतात. त्यानंतर साधारणतः १५ ऑगस्टनंतर कासवरील फुलांचे आगमन सुरू होऊन फुलांच्या गालिचांचे वेध सर्वांनाच लागतात.

पण, कासवरील फुलांचे आगमन आणि प्रमाण पूर्तता निसर्गावर अवलंबून असते. दोन महिन्यांपासून सातत्याने पडणारा पाऊस, धुके असल्याने फुलांना अनुकूल परिस्थिती नाही. थोडेफार ऊन पडून पठारला ताप मिळाल्यास फुलांचे आयुष्यमान चांगले बहरते. त्यातच मागील आठ दिवस पावसाने उघडीप दिली होती; परंतु पुन्हा मुसळधार पाऊस रोजच कोसळत असल्याने आलेल्या फुलांनाही याचा फटका बसला आहे. टोपली कारवीची चांगली फुले बहरली होती; परंतु पावसाच्या फटक्याने ही फुले झडून गेली. त्यामुळे कासवरील जैवविविधता बहरण्यासाठी पावसाने काही काळ विश्रांती घेणे गरजेचे आहे.

कास पठारावरील सर्व व्यवस्था पाहण्यासाठी सहा गावांची कार्यकारी समिती असून, या समितीमार्फत हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सहा गावांतील १२८ लोकांना यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे, तसेच संपूर्ण पठाराला फुलांच्या क्षेत्रात पर्यटक जाऊन नासधूस होऊ नये, यासाठी जाळी लावण्यात आली आहे. पार्किंगची जागा तयार केली आहे. पार्किंगपासून पठारापर्यंत जाण्यासाठी बसची व्यवस्था केली आहे. नवीन स्वच्छतागृहे तयार करण्यात आली आहेत. आवश्यक ती सर्व तयारी झाली असून, प्रतीक्षा आहे ती योग्य वातावरणाची.

सद्यस्थितीत कास पठारावर पांढरी हळद (चवर), टूथब्रश, कारवी, तेरडा, वायतुरा, मंजिरी, दिपकांडी, पंद, भुईकारवी, नीलिमा, आभाळी, नभाळी आदी फुलांच्या प्रजाती तुरळक प्रमाणात दिसत असून, पावसाने विश्रांती घेऊन ऊन पडल्यास फुलांचे गालिचे होणार आहेत.

आगामी चार ते पाच दिवसांचा अंदाज घेऊन निसगनि साथ दिल्यास आणि फुलांचे प्रमाण पाहून हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. याबाबत कासची वेबसाइट www.kas.ind.in यावरून ऑनलाइन बुकिंग व लोकांना संपूर्ण माहिती दिली जाईल. -दत्ता किर्दत, अध्यक्ष कास समिती


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाच्या घरांच्या किमतींत घट करत असल्याची केली घोषणा 
पुढील बातमी
संभाजीनगर येथे धार्मिक, शैक्षणिक स्थळांसाठी डस्टबिनचे वाटप

संबंधित बातम्या