सातारा : शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला निर्माण होणार्या अडथळ्यांविरोधात सातारा शहर वाहतूक शाखेने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. पारंगे चौक ते पोलिस परेड मैदान या मार्गावरील प्रशासकीय इमारतीजवळ रस्त्याच्या कडेला करण्यात आलेली बेकायदा अतिक्रमणे हटविण्यात आली.
या मार्गावर रस्त्यालगत अनधिकृत बांधकामे आणि विविध स्वरूपाची अतिक्रमणे झाल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी झाली होती. कार्यालयीन वेळेत वाहनांची वर्दळ वाढत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. तसेच पादचार्यांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत होता.
अतिक्रमणांमुळे रस्त्याची मूळ रुंदी कमी होत असल्याची बाब वाहतूक शाखेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर दोन्ही विभागांच्या समन्वयातून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. कारवाईनंतर या मार्गावरील वाहतुकीसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध झाली आहे.
दरम्यान, शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि शासकीय कार्यालयांच्या परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्न अद्याप कायम आहे. रस्त्यालगत हातगाड्या, टपर्या, अनधिकृत फलक व साहित्य ठेवले जात असल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे. त्यामुळे पारंगे चौकाप्रमाणेच शहरातील इतर अडथळेही प्रशासनाने तातडीने हटवावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.