सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप

by Team Satara Today | published on : 19 November 2024


सातारा : सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानासाठी मतदान केंद्रांचे साहित्य वाटप करण्यात आले आहे. सर्व कर्मचारी साहित्यासह मतदान केंद्रावर पोहोचले आहेत. साताऱ्यातील सर्वात दुर्गम असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी खोऱ्यातील चकदेव मतदान केद्राच्या साहित्याचे वाटप प्रथम करण्यात आले. साताऱ्यातून मतदान साहित्य पोहोचण्यासाठी मोठ्या संख्येने एस टी बस मागविण्यात आल्याने जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असून मतदानाची प्रक्रिया मार्गी लागली आहे. बुधवारी सकाळी सात पासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

साताऱ्यातील वाई मतदार संघात सर्वात दुर्गम असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी खोऱ्यातील चकदेव मतदान केंद्राच्या साहित्याचे वाटप प्रथम करण्यात आले. या मतदान केंद्रावर जाण्यासाठी पथकाला शिवसागर जलाशयातून बार्जं मधून गेल्यानंतर पुढे दीड तासाचा पायी प्रवास करून मतदान केंद्रावर पोहोचावे लागते. या ठिकाणी फक्त ४९ मतदार आहेत. दुर्गम भागात जाणारे हे पथक असल्याने या पथकाला पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा वाई येथे प्रशासनाच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर पुरेसा कर्मचारी वर्ग पुरवण्यात आला आहे. यामध्ये विभागीय अधिकारी ४३६, केंद्राध्यक्ष ३९५, इतर कर्मचारी ११ हजार ८६९ असे एकूण १६ हजार २७१ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. मतदान केंद्रावर मतदारांशी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नम्रतापूर्वक संवाद साधण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदानादिवशी ग्रामीण भागात गटविकास अधिकारी आणि शहरांमध्ये पालिका मुख्याधिकारी यांच्याकडून जास्तीत जास्त मतदान कशाप्रकारे होईल याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आज अखेर वय वर्ष ८५ च्या वरील १९१४ मतदार असून त्यापैकी १७८७ मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे ३२३ कर्मचारी असून त्यापैकी ३११ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ३ हजार ९७ पोलीस कॉन्स्टेबल, तसेच २ हजार ९४० होमगार्डची नेमणूक करण्यात आली आहे. केंद्रीय निमलष्करी दलाच्या आठ कंपन्या, राज्य राखीव दलाची एक कंपनी नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांनी अप्पर पोलीस अधीक्षक, विभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांना निवडणूक कामांची जबाबदारी सोपविली आहे. कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य घडल्यास अशा व्यक्तीवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म

संबंधित बातम्या