सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मंगळवारपासून आचारसंहिता लागू झाली. जिल्ह्यामध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्या संदर्भाने सातारा जिल्ह्यात 3165 मतदान केंद्रे असून जिल्ह्यातील 24 लाख 28 हजार 871 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख, निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण व जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी डुडी पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यात मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी विशेष संक्षिप्त पूनर्निरीक्षण कार्यक्रम व सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. त्यानुसार सातारा जिल्ह्यात पुरुष मतदार 13 लाख 31 हजार 254 व महिला मतदार 12 लाख 975 इतके आहेत. असे एकूण 26 लाख 28 हजार 871 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यामध्ये 112 तृतीयपंथी यंदा मतदानाचा हक्क बजावतील. सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण 3165 मतदान केंद्र आहेत. मतदान केंद्रांवर मतदारांच्या सोयी सुविधेसाठी त्यांना टोकन देण्यात येणार आहे. मतदारांनी रांगा लावण्याची गरज नाही. मतदान केंद्राच्या शेजारी स्वतंत्र खोलीमध्ये खुर्च्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यात 100 मतदान केंद्र ही विशिष्ट संकल्पनेवर आधारित असतील. यामध्ये 16 मतदान केंद्रांवर महिला कर्मचारी केंद्र हाताळतील. आठ मतदान केंद्रांवर दिव्यांग कर्मचारी आपली शासकीय जबाबदारी पार पाडतील. मतदारांना काही तक्रार असल्यास 1950 या टोल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधावयाचा आहे.
आचारसंहिता लागल्यामुळे सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील बॅनर तसेच राजकीय व्यक्तींचे फोटो घोषवाक्य ही सील करण्यात येणार असून येत्या 24 तासांमध्ये राजकीय व्यक्तींची सुरक्षा आणि वाहने काढून घेण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये 3346 शस्त्र जमा करण्याची बैठक घेण्यात येणार आहे आणि ही शस्त्र जमा करण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील मतदारांच्या संख्येमध्ये 18 टक्के वाढ झाली आहे. 2019 मध्ये 9000 मतदानाची वाढ झाली होती, आता ते प्रमाण 63 हजारावर पोहोचले आहे. जिल्ह्याच्या मतदार यादीतून एक लाख 60000 स्थलांतरित व मयत मतदार वगळण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सातारा जिल्ह्यात 22 ऑक्टोबर पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस 29 ऑक्टोबर आहे. 30 ऑक्टोबर रोजी छाननी, 4 नोव्हेंबर रोजी अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत आहे. दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील एक मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मतदारसंघनिहाय आढावा घेतला असता फलटणमध्ये 355, वाई मध्ये 471, कोरेगाव मध्ये 365, माण तालुक्यातील 388, कराड उत्तर मध्ये 356, कराड दक्षिण मध्ये 342, पाटण तालुक्यात 424 व सातारा तालुक्यात 464 अशी एकूण 3165 मतदान केंद्र आहेत. संबंधित मतदान केंद्रांना व्हीव्हीपॅट मशीन पुरवण्यात आलेल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांसाठी त्यांची घरापासून ते मतदार केंद्रापर्यंत मतदान करण्यासाठी वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर दिव्यांगांसाठी रॅम्प व व्हील चेअरची व्यवस्था आहे. सातारा जिल्ह्यातील 85 वरील ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या मतदारांना घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदानातील गैरप्रकार टाळण्याकरता विशेष पथक नेमण्यात आले आहे. दारू वाटप, पैसे वाटप यासारखे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस, महसूल प्रशासन यांचे विशेष पथक तैनात राहणार असून मतदान केंद्राच्या दोन किलोमीटर क्षेत्रातील संबंधित उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या घरांवर लक्ष ठेवले जाणार आहे. जाहीर सभांमध्ये कोणतेही प्रक्षोभक भाषण उमेदवारांना देता येणार नाही. अशा भाषणाची पाच मिनिटांची व्हिडिओ क्लिप बनवून ती निवडणूक आयोगाला पाठवली जाईल. या संदर्भात उमेदवार दोषी आढळल्यास कठोर कारवाई आदर्श आचारसंहितेनुसार केली जाणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.