सातारा : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचे ऐकिवात आले आहे. धमकी देणारा कोणी पुरोहित वर्गातील आहे. तू काय आणि राहुल सोलापूरकर काय, आणखीन ब्राम्हण महासंघाचे कोण असतील ते सगळेजण जा आणि इंद्रजीत सावंत यांच्या केसाला धक्का लावा मग तुम्हाला कळेल आम्ही कोण आहोत, अशा शब्दात माजी आमदार लक्ष्मण माने यांनी धमकी देणाऱ्यांवर निशाणा साधला. दरम्यान, त्यांनी एस.सी., एस.टी., व्ही.जे.एन.टी., ओ.बी.सी., महासंघाच्यावतीने विविध मागण्यांसाठी दि.२0 मार्च रोजी महाड येथून चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या राज्यव्यापी परिषदेची सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगितले.
सातारा येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लक्ष्मण माने म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे संविधनाने मुख्यमंत्री आहेत. ते आम्ही मान्य केले आहे. त्यांच्याकडे संख्याबळ आहे. फडणवीस हे ब्राम्हण आहेत आम्हाला माहिती आहे. तुम्ही कशाला सांगताय. मोगलाई लागून गेली काय, पेशवाई आहे काय येथे. येथे लोकशाही आहे. मुख्यमंत्र्यांच्या जातीतल्या माणसाने धमक्या देणे बरोबर नाही. तुम्ही मत मांडू शकता परंतु तुम्ही मारण्याची भाषा करुन प्रश्न सुटणार नाहीत. अनुसूचित जाती जमाती संरक्षण कायदा, भटके विमुक्त नवबौद्ध यांना लागू करावा, मुळच्या कायद्यात झालेल्या सर्व दुरुस्त्या रद्द कराव्यात. ॲट्रोसिटी ॲक्ट मूळ लागू करावा, जातीय जनगणना करावी, जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना देशाची सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठेचा वाटा मिळावा, देशातील कोणत्याही नागरिकाला फक्त दोन वेळा पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री होता येईल, कोणासह तिसरी टर्म मिळणार नाही. यासाठी संविधानीक मार्गाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देवून राज्यव्यापी पहिली परिषद दि. २0 मार्च रोजी महाड येथे चवदार तळ्याच्या सत्यागृह दिनाच्या दिवशी करुन पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले.