सातारा येथे होणाऱ्या 15 व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे; दि २ व ३ मे रोजी होणार संमेलन

by Team Satara Today | published on : 01 February 2026


सातारा  :  क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या १२५ व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून प्रति सरकारच्या सातारच्या भूमीत शनिवार, दि. २ मे व रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी होणाऱ्या १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत व विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे मार्गदर्शक प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांची निवड एक मताने करण्यात आली आहे अशी माहिती संमेलनाच्या संयोजन समितीचे कार्याध्यक्ष विजय मांडके व सरचिटणीस ॲड. राजेंद्र गलांडे यांनी दिली. 

सह स्वागताध्यक्ष म्हणून संयोजन समितीचे अध्यक्ष असलेले ह. भ. प. डॉ. सुहास महाराज फडतरे यांची निवड करण्यात आलेली आहे. 

ज्येष्ठ विचारवंत , मराठीतील ख्यातनाम व्याख्याते व संस्कृतचे गाढे अभ्यासक  प्रा. डॉ. आ.ह. साळुंखे हे मुंबईच्या धारावी येथे 1999 साली  झालेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटक होते. सोलापूर येथे झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तेव्हापासूनच ते विद्रोही सांस्कृतिक चळवळीशी संबंधित आहेत व मार्गदर्शकही आहेत. कोणत्याही प्रकारे अखिल भारतीय म्हणवणाऱ्या साहित्य संमेलनाशी त्यांचा संबंध आलेला नाही.

स्वागताध्यक्ष व सहस्वागताध्यक्ष यांच्या निवडी बरोबरच संमेलनाच्या तारखा ही निश्चित करण्यात आलेल्या आहेत. शनिवार दि 2 मे व रविवार दि 3 मे 2026 रोजी हे संमेलन सातारा येथे होणार आहे. असेही विजय मांडके व ॲड. राजेंद्र गलांडे यांनी सांगितले.‌

प्रा. डॉ. आ.ह. साळुंखे व ह. भ. प. डॉ. सुहास महाराज फडतरे यांच्या निवडीबद्दल त्यांचे डॉ. भारत पाटणकर, विद्रोही सांस्कृतीक चळवळीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष कॉ धनाजी गुरव व सरचिटणीस डॉ. जालिंदर घीगे , डॉ. बाबुराव गुरव , ॲड. सुभाष पाटील ,  कॉ.अविनाश कदम मुंबई , प्रागौतम काटकर यांनी अभिनंदन केले आहे.‌


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उल्लेखनीय कामगिरीबद्दल सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कारांने सन्मानित
पुढील बातमी
राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपणारा अजितदादांसारखा नेता हरपला; साताऱ्यात सर्वपक्षीय शोकसभेत मान्यवरांची श्रद्धांजली

संबंधित बातम्या