सातारा : कास - सातारा सार्वजनिक मार्गावरील एकीव फाट्यानजीक भरधाव वेगाने धावणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले. या प्रकरणी बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वैभव किसन यादव (वय 33, रा. सासपडे, ता. सातारा, सध्या रा. जानाई मळाई सोसायटी, चंदननगर, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी (दि. 17) दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास एकीव फाट्यानजीक कास - सातारा मार्गावर टोयोटा कार (क्र. एमएच 14 सीएस 5849) चालक महेश मारुती पिसाळ (वय 31, रा. इंदिरानगर, विलासपूर, ता. सातारा) याने वाहन अविचाराने, हयगयीने व बेदरकारपणे चालविले. त्यामुळे कार रस्त्यावरून खाली उतरून रस्त्यालगतच्या झाडावर जोरात आदळली.
या अपघातात फिर्यादी वैभव यादव यांच्या डोक्याला, छातीला व डाव्या हाताला दुखापत झाली. तसेच कारमधील त्यांचा मित्र राहुल आण्णा ननावरे (वय 33, रा. कारंडवाडी, पो. देगाव, ता. सातारा) याच्या डोक्याला, छातीला तसेच हात-पायांना दुखापत झाली. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार वायदंडे पुढील तपास करत आहेत.