सातारा : सातारा शहर पोलिसांनी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तब्बल 96 जणांवर कारवाई करीत या कालावधीसाठी हद्दपार केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी दि. 7 ते 18 रोजीपर्यत साजरा होणारा गणेशोत्सव निर्भयपणे पार पाडण्याकरीता सराईत गुन्हेगारावर प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते.
दिलेल्या आदेशानुसार दि. 7 ते 18 कालावधीत अवैध व्यवसाय करणारे व शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल असणाऱ्या तब्बल 96 सराईत गुन्हेगारांना सातारा जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मिरवणुकीमध्ये वावर करू नये, परिसरात थांबू नये किंवा कोणत्याही गंभीर स्वरूपाचा गुन्हा यांच्याकडून घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तसेच सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये यासाठी कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसिलदार, सातारा तालुका यांच्या आदेशान्वये सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतील एकुण 96 सराईत गुन्हेगारांवर बी.एन.एस.एस. कलम 163 अन्वये दिनांक 7 रोजीच्या 00.00 ते दि. 18 रोजीच्या 24.00 वाजेपर्यत सातारा जिल्हा हद्दीतुन हद्दपार करण्यात आले आहे.
ही कारवाई सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के व पोलीस निरीक्षक गुन्हे सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार दीपक इंगवले, संदीप पवार व पोलीस शिपाई रोहित जाधव, अमोल सापते यांनी केली आहे.
सातारा शहर पोलिसांकडून तब्बल 96 जण हद्दपार
by Team Satara Today | published on : 08 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा