बदलीसाठी ७२ शिक्षकांनी दिले बोगस दिव्यांग प्रमाणपत्र

by Team Satara Today | published on : 19 August 2025


सातारा  : बदलीत लाभ मिळण्यासाठी दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी सुरूच असून आणखी १२ गुरुजींचे प्रमाणपत्र अपात्र असल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आला आहे. त्यामुळे आतापर्यंत ७२ प्राथमिक शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रात बोगसपणा दिसून आला आहे. तसेच आतापर्यंत ३८ गुरुजी पडताळणीसाठी गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे बोगस प्रमाणपत्राबाबतची व्याप्ती वाढतच चालल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक विभागांतर्गत काही शिक्षकांनी बदलीत लाभ मिळण्यासाठी स्वत:च्या तसेच कुटुंबातील व्यक्तीचे दिव्यांग आणि आजारपणाचे प्रमाणपत्र दिले आहे. शिक्षण विभागाकडे अशा ५८६ प्रमाणपत्रांची माहिती प्राप्त झाली आहे. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी या प्रमाणपत्रांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पडताळणी सुरू झाली आहे आतापर्यंत ३९० दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ३५२ शिक्षक प्रत्यक्षात उपस्थित राहिले. त्यातील २५६ जणांचे प्रमाणपत्र योग्य दिसून आले. ७२ जणांच्या प्रमाणपत्रात बोगसपणा दिसून आला. सोमवारी आलेल्या अहवालानुसार १२ अपात्र ठरले आहेत, तर ११ जणांनी पडताळणीकडे पाठ फिरवली होती.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी या प्रकरणात आतापर्यंत तिघांवर कारवाई केली आहे. माण तालुक्यातील सोकासन येथील जिल्हा परिषद शाळेतील वरिष्ठ मुख्याध्यापक विनायक पानसांडे, कराड तालुक्यातील आगाशिवनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षिका सुरेखा प्रभाकर वायदंडे आणि माण तालुक्यातील काळेवाडी शाळेतील उपशिक्षक श्रीकांत विष्णू दोरगे यांनाही निलंबित केले आहे. आणखीही काही शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आता बेल्जी शेफर्ड श्वानपथक
पुढील बातमी
जि.प प्राथ.शाळा पाटणेवाडी येथे भीमराव कांबळे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण

संबंधित बातम्या