सातारा : कराड शहर परिसरात सातत्याने शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीविरुद्ध सातारा पोलिसांनी मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे. हद्दपार प्राधिकरण तथा सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये या टोळीला संपूर्ण सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या हद्दीतून नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचा आदेश पारित केला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे कराड परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मोठी खळबळ उडाली असून सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
या कारवाईमध्ये आगाशिवनगर (ता. कराड) येथील दांगटवस्ती येथे राहणारा टोळी प्रमुख रोहित चंद्रकांत लाखे (वय २९) आणि त्याचा साथीदार तथा टोळी सदस्य मोहित चंद्रकांत लाखे (वय २६) यांना हद्दपार करण्यात आले आहे. या टोळीवर सातारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये शरीराविरुद्धचे गंभीर आणि दखलपात्र गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी पोलिसांनी त्यांच्यावर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई केली होती, मात्र तरीही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया थांबल्या नव्हत्या. कायद्याचा कोणताही धाक न राहिल्याने या टोळीचा स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत होता. त्यामुळे या टोळीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सामान्य जनतेतून सातत्याने होत होती.
या पार्श्वभूमीवर कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे सातारा व सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव तयार करून तो हद्दपार प्राधिकरणाकडे सादर केला होता. या प्रस्तावाची सखोल चौकशी कराड विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेले ठोस पुरावे आणि गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी या टोळीस दोन्ही जिल्ह्यांतून नऊ महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे अंतिम आदेश दिले.
सातारा जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून, आगामी काळात जिल्ह्यातील इतर सराईत गुन्हेगारांविरुद्धही हद्दपारी, मोक्का आणि एमपीडीए सारख्या अत्यंत कठोर कायद्यांतर्गत कारवाया केल्या जाणार असल्याचा इशारा पोलीस दलाकडून देण्यात आला आहे. या हद्दपारीच्या प्रक्रियेत अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पोलीस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा सणस तसेच कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल आनंदा जाधव आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनाली मोहिते यांनी सरकार पक्षाच्या वतीने महत्त्वपूर्ण पुरावे सादर करून मोलाची कामगिरी बजावली.
कराडमधील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला मोठा दणका; सातारा आणि सांगली जिल्ह्यातून ९ महिन्यांसाठी हद्दपार
by Team Satara Today | published on : 17 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा