सातारा : सुमारे 6 कोटी 35 लाखांच्या फसवणूक प्रकरणी तीन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुलै 2023 पासून ते 19 ऑगस्ट 2026 दरम्यान सातारा शहर परिसरात राहणाऱ्या तक्रारदार महिलेच्या पोस्ट तयार करण्याच्या कंपनीमध्ये कच्चामाल तयार करण्यासाठी त्यांनी एम एस सीनियर मशीनरी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी दाबुर्जी, अमृतसर, पंजाब या कंपनीकडून 6 कोटी 35 लाख 7 हजार 600 रुपये किंमतीच्या 26 मशिनरी खरेदी केल्या होत्या. याची बिलही आरटीजीएस द्वारे कंपनीला अदा करण्यात आले होते. मात्र, व्यवहारावेळी दाखविण्यात आलेल्या मशिनरीऐवजी खराब मशिनरी पाठविण्यात आल्याचा आरोप आहे. याबाबत संबंधितांशी वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही. मशिनरी दुरुस्त करून देण्यासह नवीन मशिनरी पाठविण्याचे आश्वासन देण्यात आले; मात्र त्याची पूर्तता झाली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आजपर्यंत मशिनरी दुरुस्त करून देण्यात आली नाही किंवा नवीन मशिनरी पाठविण्यात आली नाही. त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप महिला तक्रारदारांनी केला आहे. या प्रकरणी मुख्तारसिंग थिंड, अमरदीपसिंग ऊर्फ दिपू मुख्तारसिंग थिंड आणि अविनाश ऊर्फ आशु मुख्तारसिंग थिंड (सर्व रा. एम एस सीनियर मशीनरी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी दाबुर्जी, अमृतसर, पंजाब) यांच्याविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक काटकर तपास करीत आहेत.