९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सर्वांना खुला प्रवेश; सातारकर, साहित्यप्रेमी, विद्यार्थ्यांसह सर्वांनी खुल्या मनाने यावे

by Team Satara Today | published on : 30 December 2025


सातारा  : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साता-यात दि.१ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणार आहे. या संमेलनात सर्व जाती धर्मातील सर्वांसाठी खुला प्रवेश आहे. संमेलनात चार दिवस विविध, वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम होणार आहेत. संमेलनात प्रत्येकासाठी काही ना काही देण्याचा प्रयत्न संयोजन समितीने केला आहे, त्यामुळे संमेलनात सातारकर, साहित्यप्रेमी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह, युवक- युवती, गृहिणींसह सर्वांनी खुल्या मनाने यावे असे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले आहे.

तब्बल ३२ वर्षांनंतर शतकपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा) आणि मावळा फौंडेशनला मिळाला आहे. सारस्वतांच्या या उत्सवात सातारा जिल्ह्याची ओळख दर्शविणारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

वैशिष्ट्यपूर्ण संमेलन गीत

सातारा जिल्ह्याचे भौगोलिक महत्त्व अधोरेखित करत मराठी भाषा, मराठी बाणा, भाषेच्या संघर्षाचे, मराठ्यांच्या राजधानीचे तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज यांच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन घडवत सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सामाजिक योगदानाचे प्रतिबिंब दर्शविणारे 'हे शतकपूर्व संमेलन साताऱ्याचे; गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे' या संमेलन गीतातून घडले.

 ग्रंथदिंडी, शोभायात्रा लक्ष्यवेधी ठरणार

सातारा या ऐतिहासिक नगरीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त काढण्यात येणाऱ्या ग्रंथदिंडी व शोभायात्रेत भारतीय संत परंपरेपासून समाजसुधारकांचे कार्य, भारतीय संस्कृती, लोकसाहित्य तसेच साताऱ्यातील शिक्षण, पर्यटन आणि साहित्य परंपरांचे चित्रण दिसून येणार आहे. यात सातारा जिल्ह्यातील एकूण ५५ शाळा व महाविद्यालयांचे चित्ररथ समाविष्ट करण्यात येणार आहेत. तसेच शिक्षण विभागातून प्रत्येक तालुक्याचा एका या प्रमाणे ११ व जिल्हा परिषदेचा एक चित्ररथ असणार आहे. या चित्ररथांच्या माध्यमातून मराठी संत साहित्यातील सुविचार तसेच मराठी सारस्वतांनी मराठी भाषेच्या योगदानासाठी केलेल्या साहित्य निर्मितीचे दर्शन सातारकरांसह संमेलनासाठी येणाऱ्या जगभरातील साहित्यप्रेमींना घडणार आहे.

 सर्वस्पर्शी संग्राह्य दस्तावेज ठरणार 'अटकेपार' स्मरणिका

सातारा मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याला प्राचिन इतिहास असून ही भूमी मराठ्यांचे शौर्य तसेच स्वातंर्त्य संग्रामातील योगदानासाठी प्रसिद्ध आहे. मराठ्यांच्या सत्तेचे केंद्र असलेल्या सातारच्या भूमीतून मराठ्यांनी आपले शौर्य गाजवत अफगाणीस्तानच्या सीमेपर्यंत मराठा साम्राज्याचा झेंडा फडकवला. त्यामुळेच 'सातारा आणि अटकेपार' यांचे समीकरण साम्राज्याचा विस्तार आणि पराक्रम दर्शविते. या पराक्रमाची आठवण म्हणून स्मरणिकेला 'अटकेपार' असे नाव देण्यात आले आहे. शतकपूर्व साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सातारा जिल्ह्याचा वैभवशाली इतिहास, संस्कृती, रंगभूमी चळवळ, खाद्यसंस्कृती, पत्रकारिता, पर्यटन, क्रीडासंस्कृती, कृषीव्यवस्था अशा सर्वस्पर्शी विषयांवर भाष्य करणारे प्रज्ञावंतांचे लेख या स्मरणिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत.

 ग्रंथ दालनातूनच साहित्य संमेलनस्थळी प्रवेश

साहित्यिक, सांस्कृतिक विकासासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेता आणि वाचक यांचा समन्वय साधणे गरजेचे असते. सातारा येथे होत असलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हा समन्वय खऱ्या अर्थाने साधला जाणार आहे. संमेलनाच्या मुख्य मंडपात प्रवेश करण्याच्या मार्गावरच ग्रंथ दालने साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज असणार आहेत. संमेलनस्थळांपासून ग्रंथ, पुस्तक विक्रेत्यांची दालने दूर असल्याने अनेक संमेलनांमध्ये विक्रेत्यांची कुचंबणा होत असे. वाचक ग्रंथ दालनांकडे फिरकत नसल्यामुळे पुस्तक विक्रीवर परिणाम होत असे व विक्रेत्यांचे आर्थिक गणित बिघडत असे. सुयोग्य नियोजनाअभावी प्रकाशक, ग्रंथ विक्रेते, स्टॉलवरील कर्मचारी यांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

वर्षानुवर्षे आलेल्या अडचणी लक्षात घेऊन संमेलनाच्या संयोजकांनी या वेळी ग्रंथ, पुस्तक विक्रेते, प्रकाशक यांची आबाळ होऊ नये म्हणून ठोस उपाययोजना केल्या आहेत. संमेलन मंडपाची अशाच पद्धतीने उभारणी करण्यात येत आहे ज्या योगे संमेलनस्थळी येणारे साहित्यरसिक ग्रंथदालनातूनच मुख्य मंडपात प्रवेश करतील.

 संमेलनात सर्वांसाठी काही ना काही कार्यक्रम, उपक्रम

संमेलनात ग्रंथप्रदर्शन, कवी कट्टा, गझल कट्टा, बहुरुपी भारूड, कवी संमेलन, बालकुमार वाचक कट्टा, विविध विषयांवर परिसंवाद, अभिनेते प्रशांत दामले यांचा 'शिकायला गेलो एक' या नाटकाचा प्रयोग, कथाकथन, ज्येष्ठ कवियत्री अनुराधा पाटील यांची मुलाखत, समकालीन पुस्तकांवर चर्चात्मक कार्यक्रम, अमोल पालेकर लिखित ऐवज एक स्मृतीबंध या पुस्तकावर संवादत्मक कार्यक्रम, हास्यजत्रा हा सांस्कृतिक कार्यक्रम, विविध पुस्तकांवर चर्चासत्र असे वैशिष्ट्यपूर्ण, वैविध्यपूर्ण कार्यक्रम  होणार आहेत. त्यामुळे या साहित्य संमेलनास सर्वांनी खुल्या मनाने यावे असे आवाहनही संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अण्णासाहेब पाटील महामंडळ कार्यालयाला टाळे ठोकणार- सचिन मोहिते यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
पुढील बातमी
मारहाण केल्याप्रकरणी कळंबे येथील एकच कुटुंबातील ८ जणांविरोधात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या