साताऱ्यात दोन्ही महाराजांच्या पुढे तिसरी आघाडी हतबल ?; १० प्रभागात उमेदवारांची वाणवा ; शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला २१ जागा

by Team Satara Today | published on : 18 November 2025


सातारा  :  सोमवारी सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांसाठी दोन्ही राजे गट, भाजपसह तिसरा आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर आकडेवारी पाहता तिसऱ्या आघाडीला १० प्रभागात एकही उमेदवार मिळू शकला नसल्याचे स्पष्ट होत आहे. थोडक्यात निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्हीही महाराजांच्या पुढे तिसऱ्या आघाडीला हतबल व्हावे लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

सातारा नगरपरिषदेच्या जागा वाटपासाठी भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. त्याला अखेरी मूर्त रूप मिळाले. दोन्ही नेत्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ५० जागांपैकी मूळ भाजपला ६ जागा देत दोन्ही गटांनी २२-२२ जागा वाटून घेतल्या आहेत. तर नगराध्यक्षपदासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते यांना संधी देण्यात आली आहे.

राजेंच्या पॅनेलपुढे आव्हान उभे करेल असे वातावरण निर्माण करण्यात आले होते. दोन्ही राजेंकडून नाराज होणाऱ्यांवर प्रामुख्याने महाविकास आघाडीची नजर होती. हे नाराज सहज मिळतील, असे वाटत होते; पण प्रत्यक्षात उलट परिस्थिती झाली. महाविकास आघाडीची उमेदवार शोधताना दमछाक झाली. महाविकास आघाडीला पूर्ण ५० उमेदवारांचे पॅनेल उभे करण्यासाठी उमेदवार मिळाले नाहीत.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केवळ ७ प्रभागात २ आणि ७ प्रभागांमध्ये प्रत्येकी १ असे २१ उमेदवार देता आले. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ८ आणि काँग्रेसला १६ जागांवर उमेदवार मिळाले. थोडक्यात महाविकास आघाडीला सर्व ५० जागांवरही उमेदवार देता आलेले नाहीत. नगराध्यक्षपदासाठीही त्यांनी भाजपतून बंडखोरी केलेल्या सुवर्णा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत तरी महाविकास आघाडीचे दोन्ही राजे गट आणि भाजपपुढे आव्हान दिसत नाही.

अर्ज दाखल केलेले प्रभागनिहाय उमेदवार असे : नगराध्यक्ष : सुवर्णादेवी पाटील, प्रभाग २ : दयानंद नागटिळक, लक्ष्मी राठोड, प्रभाग तीन : रितेश लाड, प्रभाग चार : विकास धुमाळ, प्रभाग पाच : सोनम काळेकर, प्रभाग सात : रजिया शेख, महेश गोंदकर, प्रभाग आठ : पूजा बनसोडे, चंदन जाधव, प्रभाग अकरा : सचिन बागल, प्रभाग १२ : मीना गोंदकर, प्रभाग १४ : सीमा पवार, प्रभाग १५ : ऋषिकेश गायकवाड, आयेशा शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर प्रभाग १७ : विजय बोबडे, उषा जाधव, प्रभाग १८ : डॉ. नीता यादव, अमोल खुडे, प्रभाग १९ : अनिकेत साळुंखे, प्रभाग २४ : जितेंद्र बडेकर, प्रभाग २५ : शुभांगी निकम यांना तिकीट देण्यात आले आहे. तर प्रभाग - १, ६, ९, १०, १३, १६, २०, २१, २२, २३ या दहा प्रभागांत महाविकास आघाडीच्या पॅनेलला एकही उमेदवार मिळालेला नाही. यातही आता उमेदवारी अर्ज मागे घेताना किती उमेदवार राहणार याची उत्सुकता आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अद्यापही ऊसदर जाहीर न केलेल्या कारखान्यांनी त्वरित दर जाहीर करावा; जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश
पुढील बातमी
महाबळेश्वर गारठले; पर्यटकांसह नागरिकांना हुडहुडी, महाबळेश्वरमध्ये किमान तापमानाची 11 अंश नोंद

संबंधित बातम्या