बेधुंद ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना आवरा ; मोकाट कर्कश गाण्यांमुळे अपघाताचा धोका ; ग्रामस्थ हैराण

by Team Satara Today | published on : 08 December 2025


सातारा : सातारा- सोलापूर महामार्गावरून ट्रॅक्टर चालक मोकाट कर्कश गाणी लावून उसाची वाहतूक करीत असल्यामुळे त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून ट्रॅक्टरवर लावलेल्या कर्कश गाण्यांमुळे ग्रामस्थ हतबलच नव्हे तर हैराणही झाले आहेत. या ट्रॅक्टर चालकांवर ना कारखान्याचा ना पोलिसांचा अंकुश नसल्यामुळे त्यांचा बेधुंद पणा वाढत चालला असून संबंधितांवर पोलिसांनी कडक  कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

राज्यामध्ये १९५० साली साखर उद्योगाची स्थापना झाली. सद्य परिस्थितीत राज्यातील ऊसाचे क्षेत्र १५ लाख हेक्टरपर्यंत पोहोचले असून दैनंदिन गाळक क्षमता १० लाख पण एवढी आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक उसाचे उत्पन्न पश्चिम महाराष्ट्रात घेतले जाते. सातारा तालुक्यात उरमोडी, कण्हेर ही दोन धरणे असून सातारा तालुक्यातून उरमोडी, कृष्णा नदी प्रवाहित होते. मुबलक पाणी असल्यामुळे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उसाचे उत्पन्न घेतले जाते. सातारा तालुका परिसरात अजिंक्यतारा, जरंडेश्वर, गोपुज, किसनवीर, प्रतापगड सहकारी साखर कारखाने आहेत. प्रतिवर्षी सप्टेंबर महिन्यात बीड, जालना, नांदेड येथून मोठ्या प्रमाणावर साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस तोडण्यासाठी ऊसतोड मजूर कामगार येत असतात. सध्या सातारा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऊसतोड सुरू असून ट्रॅक्टर ट्रॉली आणि ट्रकच्या माध्यमातून उसाची वाहतूक केली जाते. 

गेले काही वर्षांपासून उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांकडून ट्रॅक्टरवर कर्कश, मोठ्या आवाजात गाणी लावली जात असून त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. हे चित्र ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातही दिसून येत आहे. या ट्रॅक्टर चालकांवर ना कारखाने ना पोलीसांचा अंकुश नसल्यामुळे त्यांचा मस्तवालपणा वाढत चालला आहे. ट्रॅक्टरवर कर्कश आणि मोठ्या आवाजात लावलेल्या गाण्यांमुळे पाठीमागून आलेल्या वाहन चालकांनी ओव्हरटेक करून पुढे जायचे असल्यास कितीही मोठ्या आवाजात हॉर्न वाजवला तरी संबंधित ट्रॅक्टर चालक त्यांना जुमानत नसल्यामुळे ठिकठिकाणी वादाचे प्रसंग पाहायला मिळत आहेत. 

सातारा शहर परिसरातील वाढे, बॉम्बे रेस्टॉरंट, अजंठा चौक परिसरातून संबंधित ट्रॅक्टरचालक ऊस घेऊन कारखान्याकडे जात असतात. या सर्व ठिकाणी वाहतूक नियमानासाठी वाहतूक शाखेचे पोलीस तैनात असतानाही त्यांच्यापुढेच हा प्रकार सुरू असतानाही मोठ्या आवाजात गाणी लावणाऱ्या एकाही चालकावर गुन्हा दाखल होत नसल्याने त्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातून ऊस वाहतूक करत असताना खेडेगावातही संबंधित ट्रॅक्टरचालक मोठ्या आवाजात गाणी  लावत असल्यामुळे त्याचा ज्येष्ठ नागरिक व महिलांना त्रास होत असून संबंधित ट्रॅक्टर चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यातील राजकीय पदाधिकाऱ्यांना विमान सेवेचा फटका; कार, बस, रेल्वेने नागपूरला हिवाळी अधिवेशनासाठी रवाना
पुढील बातमी
सहा सातारकर धावकांची जैसलमेर-लौगेवालाच्या रणभूमीवर शौर्यदौड; बॉर्डर मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करत दमदार कामगिरी

संबंधित बातम्या