बौध्द धम्मातील ‘वर्षावास’ हा धम्माचे चिंतन, मनन, आत्मपरिक्षण व विवेक जागरणाचा काळ : बाबासाहेब जगताप

by Team Satara Today | published on : 14 July 2025


फलटण : बौध्द धम्मातील वर्षावासाकडे नुसता धार्मिक विधी म्हणून पाहू नका. हा कालावधी बौद्ध धम्मगुरु, बौध्द भिक्षुच्यासाठी धम्माचे चिंतन,मनन,आत्मपरिक्षण व विवेक जागरणाचा काळ असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुक्याचे महासचिव बाबासाहेब जगताप यांनी समतानगर (विडणी)येथे वर्षावासानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

यावेळी बोलताना ते म्हणाले, वर्षावास ही संकल्पना बौध्द धम्मात का सुरु झाली?हे आपण समजून घेतले पाहिजे. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधी पावसाळा ऋतू असल्याने भिक्षुंना चरिका करण्यासाठी अनेक संकटाचा सामना करावा लागतत होता. त्यांच्या जीविताला धोका निर्माण होत होता.त्याकाळातील भौगोलिक स्थिती विचारात घेऊन वर्षावास सुरु झाला.त्यात प्रामुख्याने बौध्द भिक्षु विहारात मुक्काम करुन लोकांना धम्माचा उपदेश करीत.ते स्वतः धम्माचे विचार आत्मसात करुन मनन, चिंतन आणि स्वतःचे आत्मपरीक्षण करत होते. तथागतांनी पहिला वर्षवास सारनाथ येथील मृगदावनामध्ये केला.तिथे त्यांनी त्यांचे पूर्वीचे सहकारी पंचवर्गीय भिक्षु कौंडीण्य, वप्प, भद्दीय, महानाम व अश्वजित यांना केला.तथागत भगवान बुद्धाने आपल्या आयुष्यात ४६ वर्षावास केले.तालुक्याचे महासचिव बाबासाहेब जगताप यांनी कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित राहून वर्षावासाचे महत्व सांगितले.

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने मौजे समता नगर (विडणी) या ठिकाणी वर्षावास मालिकेतील दुसरे पुष्प गुंफण्यात आले.भगवान गौतम बुद्धांचे पहिले प्रवचन या विषयावर भारतीय बौध्द महासभेचे प्रवचनकार सोमीनाथ घोरपडे यांनी यावर विस्तृतपणे मांडणी केली.त्यांनी यामध्ये भगवंतानी सांगितलेली चार आर्य सत्य व आर्य अष्टांग मार्ग याबद्दल माहिती सांगितली.ते म्हणाले. चार आर्य सत्य व आर्य अष्टांग मार्ग हे बौध्द धम्माचे सार आहे.चार आर्य सत्य म्हणजे१) दु:ख २) दु:ख समुदय ३)दु:ख निरोध आणि ४)दु:ख निरोध गामिनी–यातच अष्टांग मार्ग येतो.अष्टांग मार्गात प्रज्ञा, शील आणि समाधी याचा समावेश होतो.प्रज्ञेमध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प,शीलात सम्यक वाचा,सम्यक कर्म,सम्यक आजीविका, तर समाधि यामध्ये सम्यक,व्यायाम,सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा समावेश होतो.तेव्हा सर्वांनी या तत्वाचा अंगीकार करून तथागतांचा धम्म जनसामन्यापर्यंत पोहचवावा. 

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष महावीर भालेराव आणि प्रचार आणि पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे उपस्थित समता नगर मधील सर्व बौद्ध बांधव व बौद्ध उपासिका व उपासिका,पंचशील मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशा पद्धतीने वर्षभर प्रवचन मालिका फलटण तालुक्यामध्ये अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरी होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी ऑगस्टमध्ये
पुढील बातमी
पावसाळ्यात रक्तवाहिन्यांचे आजार वाढलेत!

संबंधित बातम्या