जागतिक लोकसंख्या दिन: धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयात व्याख्यान संपन्न; देशाची खरी संपत्ती कार्यक्षम लोकसंख्या : प्राचार्य डॉ. अरुण आंधळे

by Team Satara Today | published on : 12 July 2026


सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात व्यावसायिक अर्थशास्त्र, बँक मॅनेजमेंट आणि बिझनेस अनॅलिटिक्स विभागाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ प्राध्यापक प्रो. डॉ. एल. एन. घाटगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

​कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यापीठाचे कुलसचिव तथा विभागप्रमुख प्रो. डॉ. विजय कुंभार यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधत या दिनाचे जागतिक महत्त्व आणि कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.

​अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी देशाची खरी संपत्ती ही तेथील कार्यक्षम आणि उत्पादक लोकसंख्या असते, असे प्रतिपादन केले. बदलत्या काळाची गरज ओळखून लोकसंख्येचे योग्य नियोजन, युवकांचा कौशल्यविकास आणि मानवी संसाधनांचा देशाच्या प्रगतीसाठी प्रभावी वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

​प्रमुख पाहुणे प्रो. डॉ. एल. एन. घाटगे यांनी लोकसंख्येच्या सद्यःस्थितीवर सखोल प्रकाश टाकला. लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या विविध सामाजिक व आर्थिक समस्यांचे गांभीर्य विशद करत त्यांनी वाढती लोकसंख्या आणि शाश्वत विकास यांतील परस्परसंबंधांचे विश्लेषण केले. लोकसंख्या वाढीचा एकूणच विकास प्रक्रियेवर होणारा परिणाम स्पष्ट करत संतुलित लोकसंख्या व्यवस्थापनाची गरज त्यांनी विविध उदाहरणांद्वारे पटवून दिली.

​या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. राजशेखर निलोलू यांच्यासह व्यावसायिक अर्थशास्त्र, बँक मॅनेजमेंट व बिझनेस अनॅलिटिक्स विभागातील सर्व प्राध्यापकांनी केले होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. विजय पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्राण्यांच्या संरक्षण व संवर्धन राज्यस्तरीय समितीची १३ वर्षांनंतर पुनर्रचना; सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र भ्रमण मार्गांचे संरक्षण होण्यास हातभार लागणार

संबंधित बातम्या