फलटण–पुसेगाव मार्गावरील ताथवडे घाटात दरड कोसळून बारामतीचा तरुण ठार

by Team Satara Today | published on : 06 July 2026


फलटण : फलटण–पुसेगाव मार्गावरील ताथवडे घाटात रविवारी दरड कोसळून झालेल्या भीषण अपघातात बारामती येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, योगेश पोपट जगताप (रा. बारामती) हे चारचाकी वाहनातून ताथवडे घाटातून प्रवास करत असताना अचानक डोंगरावरून मोठे दगड कोसळले. त्यातील एक मोठा दगड थेट मोटारीच्या बोनेटवर आदळल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व वाहन रस्त्यालगतच्या खांबावर जोरदार धडकले. या भीषण अपघातात योगेश जगताप यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वाहनात अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. अधिक तपास महिला पोलिस जाधव करत आहेत.

सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात दरडी कोसळण्याच्या घटना वाढत असून घाटरस्त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. ताथवडे घाटासह इतर घाटरस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी विशेष दक्षता घ्यावी, तसेच अतिवृष्टीच्या काळात अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसची (शरदचंद्र पवार पक्ष) कार्यकारिणी बरखास्त; नवीन निवडी लवकरच
पुढील बातमी
महाबळेश्‍वर, पाचगणी शहराची जलवाहिनी असणारा वेण्‍णा लेक ओव्‍हर फ्‍लो; पाणीपुरवठ्याची चिंता मिटली

संबंधित बातम्या