सातारा : सातार्यात 007 नंबरची गाडी म्हटलं की आठवण येते ती भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची. मात्र, आज दि. 22 रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सातार्यातील बालेकिल्ल्यात 0007 च्या कारमधून एन्ट्री झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
शरद पवार जेव्हा जेव्हा सातारा दौर्यावर येतात तेव्हा त्यांची एक खास गाडी त्यांच्या स्वागतासाठी तयारीत असते. मात्र, आज त्यांच्यासाठी 0007 या नंबरच्या कारची विशेष सोय करण्यात आली होती. ही कार कराडमधून खास मागवण्यात आली. दिवसभर शरद पवार याच कारमधून सर्वत्र प्रवास केला आहे...!!
दरम्यान, शरद पवार कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांसाठी सातारा दौर्यावर आहेत. या दौर्यावर राजकीय वर्तुळाचे सुद्धा लक्ष आहे. शरद पवार विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांशी चर्चा करणार आहेत. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त महाराजा सयाजीराव विद्यालयाच्या प्रांगणात दरवर्षीप्रमाणे सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी शरद पवार उपस्थित राहिले. सोहळ्यानंतर प्राथमिक शिक्षक बँकेच्या शताब्दीमहोत्सवी सोहळ्याला त्यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर पदाधिकार्यांशी चर्चा केल्या आहेत. दुपारी कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे निवासस्थानी त्यांनी भेट दिली. सायंकाळी रयत शिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पवारांच्या हस्ते होणार आहे.
सातारा जिल्ह्यात लढण्यासाठी तब्बल 30 जण इच्छूक
दरम्यान, जिल्ह्यात शरद पवार गटाकडून तब्बल 30 जण इच्छूक आहेत. फलटण मतदारसंघातून सर्वाधिक 13 जण इच्छुक आहेत. कराड उत्तर, कोरेगाव आणि पाटणमधून एकाचेच नाव समोर आले आहे. पण, कराड दक्षिणमधून कोणीही इच्छुक नाही. सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असणार्यांची नावे मागविण्यात आली होती. त्यानुसार 30 जणांनी विविध मतदारसंघासाठी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. जिल्ह्यात विधानसभेचे एकूण आठ मतदारसंघ आहेत. त्यातील 7 मतदारसंघासाठी 30 जण इच्छुक आहेत.