सातारा : येथील एमआयडीसीमध्ये असलेल्या श्री फीड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (बाबर पशुखाद्य) या कंपनीत पशुखाद्य तयार करताना त्यात घातक युरियाचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार कृषी विभागाच्या कारवाईत समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित कंपनी आणि कंपनीला युरियाचा पुरवठा करणाऱ्या कृषी केंद्र चालकाच्या विरोधात तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबर पशुखाद्य कंपनीत कामगार युरिया मिसळत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कृषी विभागाने तासवडे येथील संबंधित कंपनीवर धडक कारवाई करून तेथील पशुखाद्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. या तपासणीमध्ये पशुखाद्यात युरियाचे मिश्रण केले जात असल्याचे निष्पन्न झाले.
या गंभीर प्रकारामुळे कृषी विभागाने आणि तळबीड पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत बाबर पशुखाद्य कंपनीचे चालक आणि त्यांना युरियाचा पुरवठा करणाऱ्या गुजरात येथील एका कृषी सेवा केंद्राच्या मालकावर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी खत निरीक्षक तथा कृषी अधिकारी अभिजीत बाळासाहेब पाटील यांनी तळबीड पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.