महिला-बालकांवरील अत्याचारांना आळा घाला; दोषींना तात्काळ मृत्युदंड द्या - श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

by Team Satara Today | published on : 06 May 2026


सातारा : राज्यात मुली, महिला व बालकांवरील वाढत्या अत्याचार, बलात्कार व हत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सातारा तालुका विभाग यांनी राज्य सरकारकडे तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री व सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचारानंतर हत्या, तसेच चाकणमध्ये बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या, या घटनांनी राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

प्रशासनाकडून जलद न्यायाच्या घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्षात प्रक्रिया लांबणीवर पडत असल्याने गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती उरलेली नाही, अशी टीका संघटनेने केली. तात्काळ न्याय, कठोर शिक्षा आणि मजबूत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याची मागणी करण्यात आली.

महिला-बालकांच्या सुरक्षेसाठी विशेष पथके, कडक गस्त, तसेच समाजमाध्यमांवरील अश्लील व हिंसात्मक सामग्रीवर नियंत्रण आणण्याची गरजही व्यक्त करण्यात आली. दोषींना कायद्यानुसार लवकरात लवकर मृत्युदंडाची शिक्षा मिळेल यासाठी विशेष यंत्रणा उभारावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने त्वरित ठोस पावले उचलली नाहीत तर जनतेतील संताप तीव्र होईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.

यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुका प्रमुख शिवराज तलवार, हिंदू जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे, धर्मसेतु सेवा संस्थानच्या सौ. गीतांजली गोंधळेकर, समर्थ भक्त शहाजीबुवा रामदासी, अखिल भारतीय हिंदू महासभेचे उमेश गांधी, विश्व हिंदू परिषदेचे राजीव दिक्षित, हिंदुराष्ट्र गोशाळेचे गोसेवक, तसेच सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात कर्मवीरांच्या स्मृतींना होणार अभिवादन; रयत शिक्षण संस्थेचा ९ मे रोजी भव्य कार्यक्रम
पुढील बातमी
सातारा पालिकेच्या सभेविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका; ७ एप्रिलच्या सभेत विषय चर्चेविना मंजुरीचा आरोप; कारवाई न झाल्याने सुशांत मोरे यांची न्यायालयात धाव

संबंधित बातम्या