रविवार पेठेत गुटख्याच्या साठ्यावर एफडीए आणि पोलिसांचा छापा; १ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

छापा पडताच साठेबाज साहिल कोळकर फरार; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 16 November 2026


सातारा : शहरातील रविवार पेठ परिसरात बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेल्या गुटखा आणि पानमसाल्याच्या साठ्यावर अन्न व औषध प्रशासन आणि सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने सोमवारी अचानक छापा टाकला. या कारवाईत एका घरातून तब्बल ७२ किलो गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला. या मुद्देमालाची किंमत १ लाख ४३ हजार ७२९ रुपये असून, या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार पेठ परिसरात साहिल कोळकर याच्याकडून गुटखा आणि प्रतिबंधित पानमाल्याचा साठा केला जात असल्याची माहिती संबंधित यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार एफडीए आणि शहर डीबी पथकाने सोमवारी अचानक छापा टाकत तपासणी केली. यावेळी घरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा व पानमसाल्याचा साठा आढळून आला.
पथकाने हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला. दरम्यान, छाप्याची चाहूल लागताच संबंधित साठेबाज साहिल कोळकर हा पानटपरीतून पसार झाल्याची माहिती आहे. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
राज्यात गुटखा आणि प्रतिबंधित पानमसाल्याच्या विक्री, साठवणूक व वितरणावर बंदी असतानाही अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर साठा केला जात असल्याने या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाचा स्रोत, त्याचा पुरवठा कोणाकडून होत होता आणि या व्यवसायामागे आणखी कोणाचे जाळे आहे का, याचा तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरातील अपघात रोखण्यासाठी वाहतूक शाखा सरसावली; दोन धोकादायक ठिकाणांचा घेतला आढावा
पुढील बातमी
निवडणुकीआधी भूमिपूजन, अद्यापही सोळशी-वाघोली रस्ता अपूर्णच; परिसरातील ग्रामस्थांमधून नाराजी

संबंधित बातम्या