सातारा : आपल्या देशाच्या जडणघडणीमध्ये अनेक महापुरुषांचे योगदान राहिले आहे. आज आपण अशा महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजऱ्या करून त्यांना अभिवादन करतो. देश प्रगतीपथावर नेण्यासाठी महापुरुषांना केवळ अभिवादन करून चालणार नाही तर, त्यांचे असामान्य आणि जनहितवादी विचार अंगीकारून हे विचार आचरणात आणणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पत्रकार अमर मोकाशी यांनी केले.
येथील अनंत इंग्लिश स्कुलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी यानिमित्त अभिवादन कार्यक्रम आणि राज्यस्तरीय विश्वकर्मा आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त अमर मोकाशी यांचा गुणगौरव असा संयुक्त कार्यक्रम उत्साहात झाला. याप्रसंगी मोकाशी बोलत होते. यावेळी शालाप्रमुख सौ. ए.एस. शिंदे, उपशालाप्रमुख अनिल रसाळ, पर्यवेक्षक दीपक ननावरे, जितेंद्र देवकर, मराठीचे शिक्षक अंकुश कुंभार, सौ. शीतल गारे, सूर्यकांत मोरे, साहिल मोरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल अमर मोकाशी यांचा शाळेच्या वतीने शालाप्रमुख सौ. शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थिनी स्पृहा सरगडे, वैष्णवी साळुंखे, ईश्वरी शिंदे, मयुरी धुमाळ यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. सौ. शिंदे, अंकुश कुंभार, दीपक ननावरे यांनीही आपले विचार मांडले. देवकर यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख बर्गे सर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.