पुणे : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील बंधपत्रित महिला डॉक्टरच्या आत्महत्येला खून घोषित करण्याची मागणी जन आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
संघटनेने मुख्यमंत्र्यांना पाठलेल्या पत्रात या प्रकरणातील पोलिस, घरमालक व कारवाई टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. पुढे स्वतंत्र न्यायालयीन चौकशी व दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच सर्व सरकारी रुग्णालयांत ‘महिला सुरक्षा धोरण लागू करणे, ग्रामीण आरोग्य सेवेत कार्यरत महिला डॉक्टरांसाठी सुरक्षित निवास व तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करणे याही मागण्या करण्यात आल्या आहेत.
दि. २२ ऑक्टोबर रोजी उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली असून, आपल्या हातावर चार वेळा पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने बलात्कार केला आणि घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर याने छळ केला असे लिहून ठेवले होते. याबाबत तिने जुलै महिन्यातही पोलिसांकडे लेखी तक्रार दिली होती, मात्र कारवाई न झाल्याने अखेर तिने मृत्यूला कवटाळले.