अजय पवार यांचे शिवसागर जलाशयात समाधी आंदोलन

दिव्यांगांच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

by Team Satara Today | published on : 16 June 2025



सातारा : दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांनी बामणोली नोली येथील शिवसागर जलाशयामध्ये उतरून आंदोलन केले. दिव्यांग बांधवांच्या कळकळीच्या मागण्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला, या आंदोलनानंतर मेढा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी आले असून, त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहे. अजय पवार यांनी तत्कालीन काळात मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांची निवेदन सादर करून ते सोडवण्याची विनंती केली होती. मात्र त्या प्रश्नांवर अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी अजय पवार यांनी दरे परिसरातील शिवसागर जलाशयात उतरून आंदोलन केले, या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली. आमदारांना दोन लाख 80 हजार पगार आणि दिव्यांगांना मात्र दीड हजार पगार अशा आशयाचा फलक घालून त्यांनी जलाशयात उडी घेतली. दिव्यांग बांधवांच्या विविध प्रकारच्या चाळीस मागण्यांसाठी पवार यांचे सातत्याने आंदोलन सुरूच आहे. खेड येथील दिव्यांग भगिनी जगताप यांचे घर पाडण्यात आले. त्यांना अद्याप निवारा मिळालेला नाही, 200 स्क्वेअर मीटर जागा मागणीचा प्रस्ताव महसूल विभागाकडे प्रलंबित असतानाही अद्याप या महिलेला जागा मिळालेली नाही. दिव्यांग शेतकऱ्यांचे वनव्यामध्ये शेतीचे नुकसान झाले, तरी शासन त्यांना मदत करत नाही. सरकारी भरती प्रक्रियेमध्ये दिव्यांगांचा 5% निधी आणि भरती प्रक्रियेत सहभाग यालाही कोल दांडा दाखवला जात आहे. अशा विविध मागण्या करत सुमारे तब्बल पंधरा मिनिटे पवार हे जलाशयात उभे होते. या मागण्यांची शासनाने दखल घ्यावी हा पुनरुच्चार त्यांनी केला. मेढा पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांना ताब्यात घेतले आहे, यापुढे उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांना भेटून त्यांच्याकडे लोटांगण आंदोलन करण्याचा इशारा अजय पवार यांनी दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विनयभंग प्रकरणी अज्ञातावर गुन्हा
पुढील बातमी
विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संबंधित बातम्या